Reel Stunt On Flyover: रील स्टंटसाठी फ्लायओव्हरवर कार थांबवणाऱ्या दिल्लीतील व्यक्तीला अटक, यूट्यूबरला 36 हजाराचा दंड

पश्चिम विहारच्या फ्लायओव्हरवर एक तरुण आपली कार पार्क करून व्हिडिओ बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Reel Stunt On Flyover (PC - X/@GautamGeetarjun)

Reel Stunt On Flyover: दिल्लीतील पश्चिम विहारच्या उड्डाणपुलावर सोनेरी रंगाची कार उभी करून व्हिडिओ बनवणाऱ्या यूट्यूबरला पश्चिम विहार पूर्व पोलिसांनी पकडले आहे. त्याची कार जप्त करण्यात आली असून त्याला 36 हजार रुपयांचे चलनही बजावण्यात आले आहे. प्रदीप ढाका असे युट्यूबरचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी प्रदीप ढाका विरोधात निहाल विहार पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. मात्र, युट्युबरच्या इन्स्टाग्रामवर अजूनही असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of Traffic Rules) होताना दिसत आहे.

प्रदीप ढाका याने त्याच्या मित्रासोबत पश्चिम विहार उड्डाणपुलावर इसुझू हायलँडर कार बाजूला उभी केली होती. त्यामुळे जाम झाला होता. नंतर त्याने कारचा दरवाजा उघडून त्याचा व्हिडिओ बनवला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आरोपी बॅरिकेडला आग लावून व्हिडिओ बनवताना दिसत आहे. पोलिसांनी या व्हिडिओंची दखल घेत कारवाई केली आहे. (हेही वाचा -Viral Video: रिल्ससाठी काहीपण! बुलेट चालवताना तरुणाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक)

पहा व्हिडिओ - 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोनेरी रंगाच्या मॉडिफाईड कारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा व्हिडिओ X वर अपलोड करण्यात आला होता. पश्चिम विहारच्या फ्लायओव्हरवर एक तरुण आपली कार पार्क करून व्हिडिओ बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. आरोपींना पकडण्याची जबाबदारी बाह्य जिल्ह्याच्या एएटीएसकडे सोपवण्यात आली होती. पथकाने आरोपीची ओळख पटवून त्याला पकडले. याप्रकरणी पश्चिम विहार पूर्व पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्याची इसुझू हायलँडर जप्त करण्यात आली. ही कार त्याच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. वाहनात प्लास्टिकची काही बनावट हत्यारेही सापडली आहेत. (VIDEO: रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होता तरुण; मागून ट्रेनने दिली धडक, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))

याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रदीप ढाका याला 36 हजार रुपयांचे चलन बजावले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी यूट्यूबर्स किंवा इंटरनेट मीडियासाठी व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच असे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी रीतसर परवानगी घ्यावी, असंही म्हटलं आहे.