Kuno National Park Cheetah Death: नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या मादी चित्ता 'Shasha' चा मृत्यू
सोमवारी सकाळी किडनी निकामी झाल्याने साशाचा मृत्यू झाला.
Kuno National Park Cheetah Death: नामिबियातून (Namibia) मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मध्ये आणलेल्या ‘शाशा’ (Shasha) या मादी चित्ताचा (Cheetah) सोमवारी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. यासंदर्भात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. साशा तीन चित्त्यांपैकी एक होती, ज्यांना या मार्चच्या सुरुवातीला जंगलात सोडण्यात आले नव्हते. नामिबियातून आणलेली मादी चित्ता अनेक दिवसांपासून आजारी होती. सोमवारी सकाळी किडनी निकामी झाल्याने साशाचा मृत्यू झाला.
कुनो नॅशनल पार्कच्या वतीने असे सांगण्यात आले की, 22 तारखेला मादी चित्ता साशा देखरेख करणार्या पथकाला सुस्त दिसली. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. साशाच्या रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीत किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात समोर आले की, साशाला भारतात आणण्यापूर्वीच किडनीच्या आजाराने ग्रासले होते. उपचारादरम्यान साशाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Cheetah Died of Heart Attack: सौदीच्या राजपुत्राने भेट दिलेल्या चित्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून चित्त्यांची पहिली तुकडी आली होती. कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेल्या या बॅचमध्ये साशासह आठ चित्ते होते. यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात आली होती. या 12 चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच माद्या होत्या. त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानातही सोडण्यात आले.
साशा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. तेव्हापासून तिची देखभाल केली जात होती. उपचारादरम्यान साशाची किडनी नीट काम करत नसल्याचे डॉक्टरांना समजले. साशाची तब्येत पाहून डॉक्टरांच्या एका विशेष टीमला पाचारण करण्यात आले, जे साशाच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून होते. या प्रकरणी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशीही चर्चा झाली.