Cyclone Michong: चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट, 144 गाड्या रद्द; किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशासाठी इशारा दिला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरून जाणाऱ्या 144 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Cyclone Michong: बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळ (Cyclone Michong) अधिक धोकादायक बनले आहे. मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशासाठी इशारा दिला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरून जाणाऱ्या 144 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्गच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशाच्या मोठ्या भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची, आणखी तीव्र होऊन दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीतून सोमवारी सकाळी पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात घोंघावतय मोचा चक्रीवादळ, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी)
त्यानंतर, ते उत्तरेला जवळजवळ समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याजवळ सरकेल आणि मंगळवार दुपारपूर्वी तीव्र चक्री वादळाच्या रूपात किनारपट्टीला धडकेल. याबाबत पीएम मोदींनी सीएम रेड्डी यांच्याशी चर्चा करताना चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचाही आढावा घेतला. राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तामिळनाडू, ओडिशामध्ये मुसळधार पाऊस -
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून तामिळनाडू तसेच ओडिशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. भुवनेश्वरमधील हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने सांगितले की, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मलकानगिरी, कोरापट, रायगडा, गजपती, गंजम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. 4 ते 6 डिसेंबर दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने अनेक भागात पावसाबाबत यलो आणि नारंगी अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत, उत्तर तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे.
चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारी भागात झोपड्या व कमकुवत इमारती आणि इतर संरचनांचे नुकसान झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडांच्या फांद्या तुटून लहान व मध्यम आकाराची झाडे उन्मळून पडण्याचा धोका आहे. मुसळधार पावसामुळे वीज आणि दळणवळणाच्या लाईन्सचे किरकोळ नुकसान, कच्च्या रस्त्यांचे मोठे नुकसान आणि पक्क्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान होण्याचीही शक्यता आहे. (वाचा - Maharashtra Weather Update: 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिला इशारा)
मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेने मुसळधार पाऊस आणि वादळाचा परिणाम होण्याची शक्यता असलेल्या किनारपट्टी भागातून जाणाऱ्या 144 गाड्या रद्द केल्या आहेत. संबंधित गाड्यांची उपलब्धता तपासूनच जनतेने प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. रद्द करण्यात आलेल्या 144 गाड्या 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत धावणार होत्या. या गाड्यांचे तपशील सर्व रेल्वे स्थानके आणि रेल्वे वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये तामिळनाडूतून जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे.
रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पूर्व किनारपट्टी रेल्वे, दक्षिण रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे आणि ईशान्य सीमा रेल्वेच्या 12 विभागीय रेल्वे मार्गांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये अवकाळी पाऊस -
गुजरातमधील भरूच जिल्ह्यातही रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक भागातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला -
भारतीय हवामान खात्याने आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूच्या किनारी भागासाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. मुसळधार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये चेन्नई, कुड्डालोर आणि एन्नोर बंदरांवर लोकांना सावध करण्यासाठी चिन्हे लावण्यात आली आहेत.
एनडीआरएफने 15 जणांची सुटका -
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांनी तांबरम भागातील सुमारे 15 लोकांना पाणी साचल्यामुळे वाचवले. चेन्नई जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तांबरम प्रदेशातील पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर भागात पाणी साचल्याने आणि वीज खंडित झाल्याने लोकांची सुटका करण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)