Covid19 Outbreak In India: देशात पुन्हा वेगाने पसरतोय कोरोना व्हायरस; गेल्या 24 तासांत रुग्णांचा आकडा 11 हजारपार

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 11,109 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus (Photo Credit - ANI/Twitter)

Covid19 Outbreak In India: देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 11 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच उपचार घेत असलेल्या अशा कोरोना बाधितांचा आकडा 49 हजारांच्या पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 11,109 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 236 दिवसांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या देशात 49,622 सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या काही दिवसांत दिल्ली-राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगड-पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय केरळमध्ये नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Covid-19: आता कोरोना रुग्णाच्या रक्ताद्वारे समजणार रोगाची तीव्रता आणि मृत्यूची शक्यता- Study)

तथापी, दैनंदिन संसर्ग दर 5.01 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक संसर्ग दर 4.29 टक्के आहे. देशात आतापर्यंत 4,47,97,269 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णांपैकी 0.11 टक्के आहे. संसर्गातून बरे होण्याचा दर 98.70 टक्के आहे. आतापर्यंत 4,42,16,586 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. लसीकरणाबद्दल बोलायचे तर देशात कोविडविरोधी लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, गुरुवारी, भारतात कोरोनाचे 10 हजार 158 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानुसार, भारतात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 4.42 टक्के आणि साप्ताहिक दर 4.02 टक्के होता. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी 0.10 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत देशात 42 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, संसर्गामुळे 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, गोरखपूरचे संचालक डॉ. रजनीकांत यांना कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'भारतात चौथी लाट येणार नाही. आता देशातील बहुतांश लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. म्हणूनच घाबरण्याची गरज नाही तर सुरक्षित राहण्याची गरज आहे. प्रतिबंधासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.'