सर्वसामान्यांना मोठा धक्का; घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 ते 150 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

सध्या महागाईचा सामना करत असलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी (Cooking Gas Prices) 100 ते 150 रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

महागाईच्या काळात सर्वसामान्यांना अनेक अडचणीचा सामाना करावा लागत असताना त्यांच्यासमोर नवीन समस्या उभी राहिली आहे. सध्या महागाईचा सामना करत असलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी (Cooking Gas Prices) 100 ते 150 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. तसेच गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या 6 महिन्यात सरासरी 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर सध्या भडकल्याचे दिसत आहेत. आता येत्या काळातही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे गॅस कंपन्यांचा फायदा होणार असला तरी, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे समजते.

सबसिडीनुसार, प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात 12 सिलिंडर दिले जातात. त्यानंतरचे सिलिंडर बाजारदराने खरेदी करावे लागतात. देशात एलपीजी सिलिंडरचे 18.11 कोटी ग्राहक असून, त्यात उज्ज्वला योजनेंतर्गत कनेक्शन देण्यात आलेल्या 2.5 कोटी महिलांचाही समावेश असल्याची माहिती प्रधान यांनी दिली. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या सिलिंडरची मासिक दरवाढ दोन रुपयांऐवजी चार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च 2020 पर्यंत सबसिडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- मुंबई: महाराष्ट्र राज्य सडक विकास प्राधिकरणाकडून वांद्रे-वरळी सीलिंकवर फास्टॅग सुरु

सध्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 557 रुपयांच्या आसपास आहे. सरकारी तेल कंपन्यांना 157 रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. कंपन्यांनी दरवाढ सुरू ठेवल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 60 डॉलर प्रति बॅरेल राहिल्यास सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम घटवली जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास सिलिंडरचे भाव 100 ते 150 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.