Congress Protest at Delhi: महागाईविरोधात दिल्लीत काँग्रेसचा हल्लाबोल; अशोक गेहलोत म्हणाले, मोदी सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप मोठा फरक आहे
या सरकारला धडा शिकवावा लागेल. बेरोजगारी आणि महागाई हे मोदीजींचे दोन भाऊ आहेत."
Congress Protest at Delhi: देशाची राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आज महागाईविरोधात 'हल्ला बोल रॅली' (Mehngai Par Halla Bol) काढत आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदान आणि राजधानीच्या इतर भागांभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या रॅलीमध्ये दिल्ली आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक काँग्रेस नेते पोहोचले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "केंद्र सरकारने सीबीआय-ईडीची दहशत निर्माण केली आहे. मोदी सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. आजची काँग्रेसची रॅली पाहून मोदी सरकारच्या लोकांना घाम फुटेल. ही रॅली फक्त सुरुवात आहे. होय, पुढे एक दीर्घ लढाई लढली जाईल. राहुल गांधींप्रती एकता दाखवण्यासाठी आणि भारताला एकसंघ करण्यासाठी देशभरात यात्रा काढण्यात येत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचाराचे धोकादायक वातावरण आहे", असंही गेहलोत यावेळी म्हणाले.
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "केंद्र सरकारला गरिबांची चिंता नाही, पण जोपर्यंत देशावर राज्य करणारे लोक जागे होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. या सरकारला धडा शिकवावा लागेल. बेरोजगारी आणि महागाई हे मोदीजींचे दोन भाऊ आहेत." (हेही वाचा - Congress: महागाई विरोधात कॉंग्रेसचा एल्गार, दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल)
दरम्यान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा म्हणाले की, आज सामान्य माणूस बेरोजगारी आणि महागाईचा सामना करत आहे. हरियाणाची अवस्था, शेतकरी आणि जवानांची अवस्थाही दयनीय आहे, दोघांनाही सन्मान मिळत नाही. तसेच यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "आपल्या कार्यकर्त्यांनी आज ज्या उत्साहाने रामलीला मैदानावर आपली उपस्थिती नोंदवली आहे, त्यावरून आता दिल्ली दूर नाही, हे स्पष्ट होत आहे."
याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "संसदेत 15 दिवसांत 15 वेळा आम्ही महागाईवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या, मात्र सरकार कधीही चर्चा करण्यास तयार झाले नाही. जेव्हा राहुलजी मैदानात आले, तेव्हा आम्ही घरापासून रस्त्यापर्यंत आंदोलन सुरू केले. तेव्हा त्यांनी केवळ पाच तास दिले, ज्यामध्ये काँग्रेसला चर्चेसाठी केवळ 28 मिनिटे मिळाली. महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, रुपयाचे मूल्य घसरत आहे, पण सरकार काहीच बोलत नाही. पंतप्रधान सभागृहात आणि माध्यमांसमोर गप्प राहतात आणि बाहेर खूप बोलतात."