रांची: लोकसभा निवडणुकीत 15 लाख देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, रामदास आठवले यांच्याविरोधात खटला दाखल
लोकसभा निवडणुकीत 15 लाख देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून या तिघांवर जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्याविरोधात रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत 15 लाख देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून या तिघांवर जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रांचीमधील डोरंड येथील रहिवासी आणि झारखंड उच्च न्यायालयाचे वकील हरेंद्र कुमार सिंह यांनी हा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा आणून सर्व भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. तसेच मोदींनी प्रत्येक वर्षी 3 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासनही दिलं होतं. या सर्व आश्वासनांचा भाजपच्या घोषणापत्रात समावेश होता. त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं नाही. मोदींनी जनतेची फसवणूक करून बहुमत मिळवलं. मोदींबरोबरचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही अशाच स्वरुपाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा होती, अशी कबुली दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयाला हा पुरावाही दिला आहे. (हेही वाचा - शिवसेना मोठा धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा)
पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्याबरोबरचं रामदास आठवले यांच्यावरही खटला दाखल करण्यात आला आहे. रामदास आठवले यांनी 18 डिसेंबर 2018 मध्ये सांगलीमध्ये जनतेशी संवाद साधताना भारतात काळा पैसा आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जातील, असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आठवले यांनीही जनतेची फसवणूक केली असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.