ISRO: 'चांद्रयान-3' ऑगस्टमध्ये होणार प्रक्षेपित, इस्रोने 2022 साठी बनवली मोठी योजना
चांद्रयान-3 मोहीम 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होती, परंतु कोरोनामुळे ते लांबले आहे.
भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था (ISRO) या वर्षी ऑगस्टमध्ये चांद्रयान-3 (Chandrayaan-3) लाँच करणार आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्र मोहिमेदरम्यान (Moon Mission) इस्रोचे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली. वास्तविक, चंद्र मोहिमेच्या विलंबासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अंतरिक्ष विभागाने लोकसभेत (Loksabha) टाइमलाइन जाहीर केली होती. अंतराळ विभागाने एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, चांद्रयान-2 मोहिमेतून मिळालेले धडे आणि जागतिक तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारे चांद्रयान-3 वर काम सुरू आहे. विभागाने पुढे सांगितले की त्यांनी आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि ऑगस्ट 2022 ला प्रक्षेपण होणार आहे.
मिशनमध्ये सतत विलंब होण्याच्या कारणांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड-19 साथीच्या आजारामुळे चालू असलेल्या अनेक मोहिमांवर परिणाम झाला आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री म्हणाले, अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि नव्याने सादर केलेल्या मागणी-आधारित मॉडेलच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पांचे प्राधान्य निश्चित करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होती, परंतु कोरोनामुळे ते लांबले आहे.
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचाही केला जाणार वापर
चांद्रयान-3 मोहिमेने ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित केलेल्या पहिल्या चांद्रयान मोहिमेपासून खूप मदत घेतली आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे पुरावे सापडले. चांद्रयान-2 चंद्रावर कोसळल्यानंतर तिसरी चंद्र मोहीम होणार आहे. चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत लँडर आणि रोव्हरचा अपघात झाला. पण त्याचे ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर (Moon Surfcae) फिरत आहे. इस्रो चांद्रयान-3 सोबत हे ऑर्बिटर वापरण्याची योजना आखत आहे. (हे ही वाचा केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandaviya यांनी संसदेमध्ये जाण्यासाठी केली सायकलस्वारी (Watch Video)
इस्रो यावर्षी 19 मिशन प्रक्षेपित करणार
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले की, अंतराळ विभागाने 2022 मध्ये 19 मिशन सुरू करण्याची योजना आखली आहे. या वर्षी ISRO 08 प्रक्षेपित व्हीकल मिशन, 07 अंतराळयान मोहिमा आणि 04 तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहिमा राबवणार आहे. मंत्री म्हणाले, अंतराळ क्षेत्रातील सुधारणांसह, अवकाश विभाग मागणीवर आधारित मॉडेलच्या आधारे उपग्रहांच्या भविष्यातील आवश्यकतांचा आढावा घेत आहे. मंत्रालये आणि संभाव्य ग्राहकांशी चर्चा सुरू आहे. 2022 ची पहिली लाँच व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.