कर्नाटक : बस कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये शाळकरी मुलांसह 25 लोकांचा मृत्यू
कर्नाटक राज्यातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला आहे
कर्नाटक राज्यातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज (शनिवारी) दुपारी ही घटना घडली आहे. मृतांमध्ये शाळकरी मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा : कोल्हापूर येथे भीषण अपघात; गाडी डोहात बुडून पाच ठार, दोन जखमी)
दुर्घटना झालेली ही बस मंड्यावरून पांडवपूरा येथे जात होती. भरधाव वेगात जात असलेली ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडल्यानंतर बुडाली असे दुर्घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले आहे. दुर्घटनेनंतर बसचालक आणि वाहक हे दोघे पोहत-पोहत पाण्याबाहेर आले आणि घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सी. एस. पुत्तराजू आणि जिल्ह्याचे उपायुक्तांना तात्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले असल्याचीही माहिती आहे. तसेच त्यांनी यातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
गेल्या आठ दिवसात कर्नाटक राज्यातली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी हुबळीच्या काठी घडलेल्या मोठ्या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, आणि 10 जण गंभीर जखमी झालो हेते.