IPL Auction 2025 Live

काँग्रेसचे कटकारस्थान उघड करण्यासाठी BJP कडून देशभरात तब्बल 70 पत्रकार परिषदांचे आयोजन

भाजपने जनतेसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी देशभरात एकाचवेळी 70 पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे

नरेंद्र मोदी (Photo Credits: ANI)

राफेल मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा वादामध्ये ठिणगी पडली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला खोटी माहिती पुरवली किंवा सुप्रीम कोर्टाने मुद्दाम खोटा निकाल दिला अशा प्रकारचे आरोप कॉंग्रेसने केले आहेत. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी तीन प्रश्न उपस्थित केले, मात्र भाजपकडून याचे कोणतेही उत्तर आले नाही. मात्र आता आक्रमक झालेल्या भाजपने या मुद्द्यावर जनतेसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी देशभरात एकाचवेळी 70 पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. महत्वाचे म्हणजे या 70 पत्रकार परिषद देशातील विविध 70 ठिकाणी होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तरीही कॉंग्रेसकडून भाजपवर अजूनही हल्लाबोल होत आहे. याबाबतील इतके दिवस काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जे कटकारस्थान रचले आहे, ते उघड करण्यासाठी या पत्रकार परिषदा घेतल्या जात असल्याचे मत भाजपचे मीडियाप्रमुख आणि खासदार अनिल बलुनी यांनी व्यक्त केले. याचसोबत या परिषदांमध्ये भाजपकडून राफेल करारप्रकरणाची आपले बाजू मांडण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कॉंग्रेसवर टीका केली. काँग्रेस सरकारच्या काळात संरक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. तसेच संरक्षण क्षेत्राला काँग्रेसनेच लुटल्याचा आरोप मोदींनी केला. दरम्यान भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री या पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका आणि बाजू मांडणार आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही पत्रकार परिषद घेणार आहेत.