कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी यांनी विकायला काढले BIG FM; तब्बल 1200 कोटींना ठरला व्यवहार
यासाठी तब्बल 1200 कोटींची त्यांना अपेक्षा आहे. ही कंपनी जागरण म्युझिक ब्रॉडकास्ट (Jagran's Music Broadcast) विकत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
एकीकडे मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात, तर दुसरीकडे त्यांचे भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. अनिल अंबानी यांच्यावरील कर्जाचा बोझा इतका वाढत आहे की आता कंपन्या विकून ते पैसा उभा करत आहेत. अनिल अंबानी यांनी आपल्या मालकीचे रेडीओ क्षेत्रात दबदबा असणारे बिग एफएम (BIG FM) विकायला काढले आहे. यासाठी तब्बल 1200 कोटींची त्यांना अपेक्षा आहे. ही कंपनी जागरण म्युझिक ब्रॉडकास्ट (Jagran's Music Broadcast) विकत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अनिल अंबानी यांना पैसे चुकते करण्यासाठी आपल्या भावाची मदत घ्यावी लागली होती. तसेच त्यांनी आपला म्युच्युअल फंड व्यवसायदेखील विकला होता. आता यानंतर त्यांनी आपला रेडीओ व्यायासाय विकायला काढला आहे. या करारानंतर 45 एफएम स्टेशनचे नियंत्रण म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड यांना दिले जाईल, तर 2020 मध्ये लॉक इन कालावधी संपल्यानंतर 14 नवीन स्टेशन स्थानांतरीत केले जातील. सध्या बिग एफएमकडे 59 स्टेशन्स आहेत.
(हेही वाचा: अनिल अंबानी यांची Rcom दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, अंबानी समूह कंपन्यांमध्ये खळबळ, 54 टक्क्यांनी घसरला आरकॉमचा शेअर)
जागरण प्रकाशन लिमिटेडने यापूर्वीही एक एफएम रेडिओ विकत घेतला आहे. त्यांनी डिसेंबर 2014 मध्ये रेडिओ सिटी चालवणारी कंपनी म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड (MBL) विकत घेतले होते. आता ही कंपनी अनिल अंबानी ग्रुपचे बिग एफएम खरेदी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा करार 1 आठवड्यात घोषित केला जाऊ शकतो. जागरण प्रकाशन प्रसारण लिमिटेड प्रथम रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कचा 24 टक्के हिस्सा खरेदी करेल.