आझम खान यांचे जयाप्रदांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; गुन्हा दाखल, महिला आयोगानेही मागितले स्पष्टीकरण

शाहाबाद मेजिस्ट्रेट महेश कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिला आयोगानेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

File image of Samajwadi Party leader Azam Khan | (Photo Credits: PTI)

रामपूर येथून भाजप पक्षाकडून जयाप्रदा (Jaya Prada) तर समाजवादी पार्टीकडून आझम खान (Azam Khan) निवडणूक लढवत आहेत. जयाप्रदा आणि आझम खान यांच्यामधून विस्तवही जात नाही असे म्हटले जाते, त्यात आझम खान यांनी रविवारी पुन्हा एकदा  जाहीर सभेमध्ये जया प्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावर आता चौफेर टीका सुरु झाली आहे. सुषमा स्वराज यांनीदेखील याबाबत ट्वीट केले आहे. याप्रकरणी आजम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहाबाद मेजिस्ट्रेट महेश कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिला आयोगानेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

'ज्यांना हात पकडून आम्ही रामपूरमध्ये आणले, त्यांच्याकडून 10 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी 17 वर्षे लागली. 17 दिवसांमध्ये कळाले की यांची अंतर्वस्त्रे खाकी रंगाची आहेत', असे हे वादग्रस्त विधान होते. मात्र आझम खान यांनी आता आपण जया प्रदा यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही असा दावा केला आहे. याबाबत ते म्हणाले, ‘मी दिल्लीमधल्या एका आजारी असलेल्या व्यक्तीबद्दल बोलत होतो. जो म्हणाला होता की आझम खान समोर दिसले तर त्यांना 150 रायफलींनी गोळ्या घालीन. लोकांना त्याच्याबद्दल समजायला वेळ लागला. मात्र नंतर त्याने आरएसएसची खाकी पँट घातली असल्याचे समजले.' अशी सारवासारव आझम खान यांनी केली आहे. (हेही वाचा: आयकर खात्याचा छापा, चार वेळा बदलला पक्ष; अशी आहे जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द)

आझम खान यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, मी कोणाचे नाव घेतले नाही; त्यामुळे या प्रकरणात मी दोषी ठरलो तर मी निवडणूक लढवणार नाही. याबाबत आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, असे जयाप्रदा म्हणाल्या आहेत. तसेच सुषमा स्वराज यांनीही ट्वीट केले आहे, ‘मुलायम भाई, तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्या समोर द्रौपदीचे चीर हरण होत आहे. याबाबत तुम्ही भीष्माप्रमाणे मौन राहण्याची चूक करु नका.’ असे झोंबणारे हे ट्वीट आहे.