Delhi Auto-Taxi Drivers Strike: दिल्लीत ऑटो-टॅक्सी चालकांचा संप; इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे भाडे वाढवण्याची मागणी
सीएनजीच्या किमती वाढल्याने ऑटो-टॅक्सी चालकांना त्यांचे घर चालवणे कठीण झाले आहे.
Delhi Auto-Taxi Drivers Strike: पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता सीएनजी (CNG) च्या दरातही प्रचंड वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या (Auto-Taxi Drivers) कमाईवर वाईट परिणाम झाला आहे. इंधनाच्या किंमती वाढल्या असल्या तरी भाडे वाढवण्यात आलेले नाही. सीएनजीच्या किमती वाढल्याने ऑटो-टॅक्सी चालकांना त्यांचे घर चालवणे कठीण झाले आहे.
दरम्यान, सीएनजीच्या दरवाढीवरून आणि दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारकडून सीएनजीवर सबसिडी देण्याची मागणी करत ऑटो-टॅक्सी चालक संपावर (Auto-Taxi Drivers Strike) आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच नागरिकांचे हाल होत आहेत. ऑटो-टॅक्सी संपामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात असून, सोमवारी सकाळपासूनच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (हेही वाचा - Covid-19 Update: भारतात पुन्हा वाढतोय कोरोना विषाणूचा धोका? एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये 35 टक्क्यांची वाढ)
प्रत्यक्षात ऑटो आणि टॅक्सी चालकांसोबतच मिनीबस चालकांच्या अनेक संघटनाही या संपात सहभागी झाल्या आहेत. ऑटो-टॅक्सीच्या विविध युनियन भाड्यात वाढ आणि सीएनजीच्या दरात कपात आणि सीएनजीवर सबसिडी देण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बहुतेक संघटनांनी सोमवार हा फक्त एक दिवसाचा संप असल्याचे सांगितले आहे. परंतु सर्वोदय चालक संघटना दिल्लीने सांगितले आहे की, ते सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सर्वोदय ड्रायव्हर असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष कमलजीत गिल म्हणाले की, इंधन दर कमी करून आणि भाडे सुधारून सरकार आम्हाला मदत करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याने आम्ही सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे दिल्ली ऑटो रिक्षा असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सोनी म्हणाले की, आम्हाला माहित आहे की दिल्ली सरकार एक समिती बनवत आहे. परंतु आम्हाला आमच्या समस्यांवर उपाय हवा आहे जो दिसत नाही. आमची मागणी आहे की सरकारने सीएनजीच्या किमतीवर 35 रुपये प्रति किलो सबसिडी द्यावी. शेकडो ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांनी नुकतेच दिल्ली सचिवालयात सीएनजीच्या किमतींवर अनुदानाच्या मागणीसाठी निदर्शने केली.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ऑटो टॅक्सी चालकांना संपावर जाऊ नका असे आवाहन केले आहे. संपाच्या घोषणेवर गेहलोत म्हणाले की, ऑटो-टॅक्सी चालकांच्या समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाचा सखोल विचार करेल. त्यांच्या शिफारशींनुसार पावले उचलली जातील. तोपर्यंत दिल्लीकरांना होणारा त्रास पाहता ऑटो-टॅक्सी चालकांनी संपासारखे पाऊल उचलणे टाळावे.