IPL Auction 2025 Live

कानपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी अडखळून पडलेल्या 'अटल' घाटावरील पायऱ्या तोडण्यात येणार

PM Narendra Modi Tripped (PC- Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  काही दिवसांपूर्वी कानपूरमधील राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीला गेले होते. दरम्यान मोदी कानपूर येथील गंगा नदीच्या अटल घाटच्या पायऱ्या चढत असताना पडले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. सुदैवाने यामध्ये मोदींना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता कानपूर येथील स्थानिक प्रशासनाने अटल घाटावरील या पायऱ्या तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदींच्या या अपघातामुळे प्रशासनाला या घाटावरील पायऱ्यांची उंची एकसमान नसल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे या पायऱ्या तोडून नवीन पायऱ्या बांधल्या जातील, असं स्थानिक अधिकारी एम. बोबडे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा -PM Narendra Modi Pune Visit: सत्तास्थापनेच्या वादंगानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात घेणार पीएम नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या कारण)

कानपूरमधील दाहसंस्कार होणाऱ्या सर्व घाटांची बांधणी 'इंजिनियर्स इंडिया लिमिटेड'कडून 'नमामी गंगे' प्रकल्पातंर्ग करण्यात आली होती. यात अटल घाटाचादेखील समावेश होता. याअगोदरदेखील या पायऱ्या चढताना अनेक लोक पडले होते. परंतु, मोदींसोबत घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे प्रशासनाने 'इंजिनियर्स इंडिया लिमिटेड' कंपनीला पुन्हा नव्या पायऱ्या बांधण्याचे आदेश दिले आहेत.