टाटा समूहात मोठा वाद, Noel Tata यांनी N Chandrasekaran यांच्या पुनर्नियुक्तीला ठरवले 'बेकायदेशीर'

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर नोएल टाटा यांनी हा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. आता वार्षिक सर्वसाधारण सभेत चंद्रशेखरन यांना संचालकपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे टाटा समूहातील नेतृत्व संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

TATA

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी यामुळे समूहात मोठा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, नोएल टाटा (Noel Tata) यांनी या निर्णयाला विरोध करत तो 'बेकायदेशीर' असल्याचे म्हटले आहे.

17 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत टाटा सन्सच्या संचालक मंडळाने 4-1 मतांनी चंद्रशेखरन यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. या मतदानामुळे काही आठवड्यांपूर्वीच निकाली निघालेला वाटणारा उत्तराधिकाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नोएल टाटा यांनी स्वतः चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीविरोधात मतदान केल्याचे आणि या निर्णयाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे सांगितले.

नोएल टाटा यांची प्रतिक्रिया

मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत नोएल टाटा म्हणाले, "मी चंद्राच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात मतदान केले. कायदेशीर सल्ल्याच्या आधारे माझा नकाराधिकार चुकीच्या पद्धतीने डावलण्यात आला. हा निर्णय बेकायदेशीर आहे. मी माझा विरोध नोंदवला आहे."

वार्षिक सभेत हटवले जाऊ शकते पद?

वृत्तानुसार, नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्ट आता वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) चंद्रशेखरन यांना संचालकपदावरून हटवण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, "एकदा त्यांना संचालक पदावरून हटवले, की ते अध्यक्षपदी कायम राहू शकणार नाहीत." आणखी एका व्यक्तीने सांगितले की, दोन प्रमुख टाटा ट्रस्टपैकी एकाने आधीच उत्तराधिकार प्रक्रिया सुरू करण्यासाठी मतदान केले होते आणि चंद्रशेखरन यांचा तिसऱ्या कार्यकाळासाठी इच्छुक नसल्याचा आधीचा निर्णय स्वीकारला होता.

वादाचे मूळ कारण काय?

 संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी टाटा सन्सच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमधील एक तरतूद आहे. यानुसार, टाटा ट्रस्टने नियुक्त केलेल्या संचालकांच्या बहुमताची मंजुरी कोणत्याही महत्त्वाच्या (कन्सिक्वेन्शियल) निर्णयासाठी आवश्यक आहे. मात्र टाटा सन्सच्या व्यवस्थापनाने एका कायदेशीर सल्ल्याच्या आधारे पुढे जात असे नमूद केले की, मतदानात गतिरोध निर्माण झाल्यास बैठकीच्या अध्यक्षांना निर्णायक मत (कास्टिंग व्होट) देण्याचा अधिकार असतो.

टाटा सन्सच्या संचालक मंडळात चंद्रशेखरन, नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, सौरभ अग्रवाल, हरीश मानवानी आणि अनिता मरांगोली जॉर्ज यांचा समावेश आहे.

ऑगस्टमधील निर्णयाला छेद

गुरुवारचे हे मतदान ऑगस्ट महिन्यातील परिस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यावेळी चंद्रशेखरन यांनी फेब्रुवारी 2027 मध्ये सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील कार्यकाळासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सर दोराबजी टाटा ट्रस्टने (SDTT) या निर्णयाचा आदर करत नवीन अध्यक्षांची शिफारस करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

आता लक्ष वार्षिक सभेकडे

आता सर्वांचे लक्ष 31 डिसेंबरपूर्वी होणाऱ्या टाटा सन्सच्या स्थगित वार्षिक सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. ही सभा महत्त्वाची ठरणार आहे, कारण रोटेशन पद्धतीने चंद्रशेखरन यांना संचालकपदावरून पायउतार व्हावे लागणार असून, त्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे.

टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा एकत्रित हिस्सा सुमारे 66 टक्के इतका आहे, त्यामुळे पुढील निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन प्रमुख ट्रस्ट - SDTT आणि सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT) - यांचा एकत्रित बहुमताचा हिस्सा असल्याने, भागधारकांसमोर हा मुद्दा येताना त्यांची भूमिका निर्णायक ठरेल.

आणखी एक अडथळा

मात्र यामध्ये आणखी एक अडचण आहे. महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरसमोरील प्रकरणामुळे सर रतन टाटा ट्रस्टवर सध्या विश्वस्त बैठका घेण्यास मनाई आहे. या निर्बंधाचा परिणाम आधीच टाटा सन्सशी संबंधित निर्णयप्रक्रियेवर झाला आहे. मूळतः 18 ऑगस्ट रोजी नियोजित असलेली टाटा सन्सची वार्षिक सभा, SDTT आणि SRTT या दोन्ही ट्रस्टना बैठकीसाठी आवश्यक प्रतिनिधी संयुक्तपणे नामनिर्देशित करता न आल्याने स्थगित करावी लागली होती.

पुनर्नियोजित वार्षिक सभेपूर्वी SRTT संबंधीचा मुद्दा सुटला नाही, तर हा निर्बंध पुन्हा एकदा ट्रस्टच्या निर्णयक्षमतेत अडथळा ठरू शकतो.

गेल्या महिन्याभरात वेगाने बदलत गेली परिस्थिती

गेल्या एका महिन्यात हे नेतृत्व प्रकरण अत्यंत वेगाने बदलत गेले आहे - चंद्रशेखरन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेण्यापासून, ट्रस्टने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू करण्यापर्यंत आणि आता टाटा सन्सच्या संचालक मंडळाने त्यांना कायम ठेवण्याच्या निर्णयापर्यंत. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा या संपूर्ण प्रकरणातील पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement