Assembly Election 2019: दिवाळी आधीच युतीची दिवाळी; निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाकडूनअगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर भाजप-शिवसेना महायुतीच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) ची घोषणा आज ( शनिवार, 21 सप्टेंबर) करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून अगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) महायुतीच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी यावर्षी दिवाळीआधीच फटाके फुटणार तर, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजप- शिवसेना यांच्यात येत्या दिवाळी आधीच युतीची दिवाळी होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय निवडणूक आयोग आयुक्त सुनील अरोडा यांनी विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर करत अचारसंहितेची माहिती दिली आहे. त्यानंतर या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार असून 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. तसेच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. हे देखील वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Date: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारीख जाहीर; 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी
काय म्हणाले संजय राऊत?
अगामी विधानसभा निवडणुकीची तारिख जाहीर झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील युतीबाबत विधान केले आहे. दरम्यान संजय राऊत म्हणाले की, येत्या 2 दिवसात भाजप- शिवसेना यांच्यात युती होणारच! तसेच येत्या दिवळी आधीच युतीची दिवाळी होणार, असे संजय राऊत यांनी विधान केले आहे.
विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
भाजप नेते विनोद तावडे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल दिवाळीच्या एक दिवस अगोदर लागणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात दिवाळीच्या अगोदरच फटाके फुटणार असल्याचे, विनोद तावडे म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप- शिवसेना महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे.