तब्बल 17 सुवर्ण पदकं जिकून, अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूवर आली रस्त्यावर कुल्फी विकण्याची वेळ

दिनेशने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीत तब्बल 17 सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि पाच कांस्य पदके अशी 23 पदकांची कमाई केली आहे

दिनेश कुमार (Photo Credit : DNA India)

ज्याने बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करून, राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नाव कमवून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्याला भारत सरकारने मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले अशा बॉक्सरवर आज रस्त्यावर कुल्फी विकण्याची वेळ आली आहे. दिनेश कुमार असे या बॉक्सरचे नाव असून तो हरियाणाचा आहे. दिनेशने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीत तब्बल 17 सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि पाच कांस्य पदके अशी 23 पदकांची कमाई केली आहे. मात्र आज तो रस्त्यावर एका छोट्याश्या हातगाडीवर कुल्फी विकण्याचे काम करीत आहे.

30 वर्षांच्या दिनेश कुमारचा काही वर्षांपूर्वी रोड अपघात झाला होता, या अपघाताच्या उपचारासाठी दिनेशच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले होते. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिनेशला एक बॉक्सर म्हणून लौकिक मिळावा अशी दिनेशच्या वडिलांची इच्छा होती, त्यामुळे दिनेशच्या बॉक्सिंग करिअरसाठी घेतलेले कर्जही दिनेशच्या वडिलांच्या डोक्यावर होते. दिनेशच्या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढला. त्यामुळे आज नाईलाजाने दिनेशला वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी कुल्फी विकण्याचे काम करावे लागत आहे.

दिनेशने सरकारकडे मदतीसाठी याचना केली, आपल्याला सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्जही केले मात्र या कशाचाही उपयोग झाला नाही. हरयणाच्या आत्ताच्या आणि आधीच्या सरकारने त्याला कोणतीही मदत केली नाही. नोकरी नाही निदान बॉक्सिंग कोच म्हणून तरी आपल्याला सरकारने घ्यावे अशी त्याची मागणी आहे. आपण ज्याप्रकारे बॉक्सिंग करायचो तसेच बॉक्सर घडवणे हे दिनेशचे स्वप्न आहे.