Uttar Pradesh Train Accident Attempt: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ट्रेन अपघाताचा प्रयत्न; रुळांवर 10 मीटर लांबीचा पाईप ठेवला (Video)
दिल्ली-सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरील बलवा गावाजवळ 10 मीटर लांबीचा लोखंडी पाईप लावून ट्रेन उलटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मोटारमनने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवल्याने धोका टळला.
Uttar Pradesh Train Accident Attempt: उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ट्रेन उलटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने, मोटारमनच्या सतर्कतेमुळे आणि विवेकबुद्धीमुळे अनर्थ टटळला. दिल्ली-सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरील (Delhi-Saharanpur Passenger Train) बलवा गावाजवळ 10 मीटर लांबीचा लोखंडी पाईप ठेवून ट्रेन उलटण्याचा प्रयत्न झाला. चालकाने आगाऊ आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. यामुळे अनर्थ थोडक्यात टळला. तथापि, रात्री अचानक ट्रेन थांबल्याने आणि बराच वेळ उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये मोठी भीती होती. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
"काही अज्ञातांनी रेल्वे ट्रॅकवर एक जड लोखंडी पाईप टाकला होता. ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला," असे रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
घटनेनंतर शामलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रामसेवक यांनी घटनास्थळी भेट दिली. औपचारिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जबाबदारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती परंतु ट्रॅक मोकळा झाल्यानंतर आणि तपासणी केल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली.