Cyclone Biparjoy: गुजरातपाठोपाठ आता राजस्थानला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका; पुढील काही दिवसांत 'या' राज्यांमध्ये दिसणार प्रभाव
राजस्थाननंतर हे चक्रीवादळ दिल्ली-हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशकडे सरकणार आहे. 18 जूनपासून पुढील एक-दोन दिवस दिल्लीच्या आसपासच्या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण उत्तर भारताच्या तापमानात घट होईल.
Cyclone Biparjoy: दक्षिण-मध्य अरबी समुद्रातून 6 जून रोजी उद्भवलेले चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) गुजरातमधील 940 गावांमधून 16 जून रोजी राजस्थानकडे सरकत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील अनेक राज्यांच्या हवामानावर बिपरजॉयचा परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही पाऊस पडेल. भूभागामुळे या राज्यांमध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने सांगितली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली, यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. बिपरजॉयमुळे येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ लँडफॉल केल्यानंतर, बिपरजॉय आता जमिनीकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा कच्छ आणि सौराष्ट्रवर वाईट परिणाम झाला आहे.
दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, होर्डिंग्ज, विजेचे खांब उन्मळून पडले तर घरांवरील छत उडून गेले. उंच लाटांमुळे परिस्थिती चिंताजनक बनली. काही ठिकाणी साडेसात मीटरपर्यंत लाटा उसळल्या. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील 940 गावे प्रभावित झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला. तथापी, खबरदारीचा उपाय म्हणून एक लाखाहून अधिक लोकांना आधीच किनारी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बंदरे बंद करण्यात आली आहेत. उड्डाणे आणि गाड्यांचे संचालन बंद करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने जवळपास 99 गाड्या रद्द केल्या आहेत. चक्रीवादळाचा बाह्य भाग किनारी भागांवर धडकण्यापूर्वी काही तासांपूर्वी जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. चक्रीवादळ जखौजवळील किनारपट्टीवर धडकले तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वाऱ्याचा वेग सुमारे 115 ते 140 किमी प्रतितास होता. (हेही वाचा - Cyclone Biparjoy: सुरु झाली बिपरजॉय चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया, मध्यरात्रीपर्यंत चालणार- IMD)
बिपरजॉय हे गेल्या तीन वर्षांतील दुसरे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. यापूर्वी मे 2021 मध्ये 'टोक्टे'ने कहर केला होता. बिपरजॉय हे अरबी समुद्रातील सर्वात जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ बनले आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास चक्री वाऱ्याचा वेग कमी होण्यास सुरुवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतरही पाऊस सुरूच राहणार आहे. चक्रीवादळाची स्थिती हळूहळू पश्चिमेकडे सरकेल. दरम्यान पुढील तीन ते चार दिवसांत या चक्रीवादळामुळे राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये 20 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो.
राजस्थाननंतर हे चक्रीवादळ दिल्ली-हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशकडे सरकणार आहे. 18 जूनपासून पुढील एक-दोन दिवस दिल्लीच्या आसपासच्या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण उत्तर भारताच्या तापमानात घट होईल. बिहार-झारखंडमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे, मात्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 18 जूननंतर तापमानात घट होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)