तृणमूलचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जींंची नरेंद्र मोदी यांना अब्रुनुकसानीची नोटीस; उत्तर देण्यासाठी 36 तासांची मुदत
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. याबाबत उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना 36 तासांची मुदत दिली आहे. एका आठवड्य[पूर्वी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल खोटे आरोप केले होते, याबद्दल ही नोटीस बजावली गेली आहे. याबाबत अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बासू यांनी माहिती दिली आहे.
15 मे रोजी डायमंड हार्बर येथील आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवत अनेक आरोप केले होते. ‘ममता आणि अभिषेक यांनी बंगालला बदनाम केले आहे. राज्यात लुटालूट करण्यात आणि हिंसा पसरवण्यात या दोघांनी कुठलीच कसर बाकी नाही ठेवली’, अशा प्रकारची अपमानास्पद वक्त्यव्ये पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली होती. याबाबत नरेंद्र मोदी यांना मानहानीची नोटीस पाठवून, त्यांनी आपली बिनशर्त माफी मागावी अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. याबाबत त्यांना 36 तासांची मुदत देण्यात आली आहे. (हेही वाचा: पश्चिम बंगाल: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 20 तास आधीच थंडावणार प्रचारतोफा)
दरम्यान अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल कॉंग्रेसकडून डायमंड हार्बरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपाच्या नीलांजन रॉय उभ्या ठाकल्या आहेत. अमित शाह यांच्या रोडशो मुळे उसळलेल्या दंगलीमुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस-भाजप संघर्ष अजूनच वाढला आहे.