Arvind Kejriwal Resignation: दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स दुपारी 12 वाजता संपणार; पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर होणार नावाची घोषणा

आप (आम आदमी पार्टी) कडून आज दुपारी 12 वाजता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

Arvind Kejriwal (File Image)

Arvind Kejriwal Resignation:  दिल्ली मद्य घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी पदावरून पायउतार होण्याचे ठरवत पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी बैठक आयोजित केली. मात्र, या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला. बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले. काय चर्चा झाली याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र, एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आप पक्षाकडून दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. (हेही वाचा: Who Will Replace Arvind Kejriwal: दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा, कैलाश गहलोत, संजय सिंग या नेत्‍यांची नावे चर्चेत)

नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होताच केजरीवाल आज मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल सर्व मंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा केली. प्रत्येकाशी ‘वन टू वन’ चर्चा केली. आज पून्हा पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याबाबत अद्याप सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.

सौरभ भारद्वाज यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, याची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, आज ‘आप’च्या विधिमंडळातील सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात येईल, अशी माहितीही मिळत आहे. दरम्यान, मद्य धोरण घाटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

 सस्पेन्स दुपारी 12 वाजता संपणार

दरम्यान, दिल्‍ली मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत काही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. यात आतिशी मारलेना यांचे नाव आघाडीवर आहे त्याशिवाय सौरभ भारद्वाज, राघव चड्ढा, कैलाश गेहलोत यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत आपचे आमदार कुलदीप कुमार यांचेही नाव आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याही नावाची चर्चा आहे. आमदारांची बैठक होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे आता या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.