Rajasthan Shocking: उदयपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीने केले मृतदेहाचे 10 तुकडे
पोलिसांनी सर्व तुकडे गोळा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उदयपूर एमबी हॉस्पिटलमध्ये पाठवला, जिथे रविवारी पोस्टमॉर्टम दरम्यान, आरोपीने मुलीवर बलात्कार केल्यानंतर चाकूने तिचे 10 तुकडे केल्याचे उघड झाले.
Rajasthan Shocking: उदयपूर जिल्ह्यातील मावळी तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने तिची हत्या (Murder) केली. आरोपी इथेच थांबला नाही, त्याने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे 10 तुकडे केले. आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका पिशवीत ठेवून दोन दिवस आपल्याजवळ ठेवला आणि नंतर संधी मिळताच तो फेकून दिला. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील मावळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोपरा गावातील आहे. एसपी विकास शर्मा यांनी रविवारी सांगितले की, चौथीच्या वर्गात शिकणारी 9 वर्षांची मुलगी 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता शेतात जाण्यासाठी निघाली होती. ती शेतात न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मुलगी न सापडल्याने वडिलांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी आयपीसी 363 अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी उशिरा घराभोवती शोध घेतल्यानंतर मुलीच्या घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर एका पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळून आले. (हेही वाचा - Suicide on Facebook Live: सोशल नेटवर्किंग साईटवर लाईव्ह करत नदीत उडी मारुन तरुणांची आत्महत्या)
पोलिसांनी सर्व तुकडे गोळा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उदयपूर एमबी हॉस्पिटलमध्ये पाठवला, जिथे रविवारी पोस्टमॉर्टम दरम्यान, आरोपीने मुलीवर बलात्कार केल्यानंतर चाकूने तिचे 10 तुकडे केल्याचे उघड झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपी कमलेश (21) याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी शेतात जात असताना आरोपीने पाहिले होते. मुलगी या आरोपीला ओळखत होती, त्यामुळे ती त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. तिथे आरोपी कमलेशने तिच्यावर बलात्कार केला. नंतर हा सर्व प्रकार ती कुटुंबियांना सांगेल या भीतीने आरोपीने चाकूने मुलीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत ठेवले.