धक्कादायक! भावाला मारल्याचा बदला घेण्यासाठी 8 वर्षाच्या मुलाने, दीड वर्षाच्या मुलाला गटारात बुडवून, दगडांनी ठेचून मारले
दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी या भागात ही घटना घडली आहे.
देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे 8 वर्षांच्या मुलाने दीड वर्षाच्या मुलाला गटारात बुडवून नंतर दगड विटांनी ठेचून हत्या केली आहे. दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी या भागात ही घटना घडली आहे. या 8 वर्षाच्या मुलाच्या भावाला दीड वर्षाच्या मुलाच्या बहिणीने मारले होते, याचा राग मनात ठेऊन या मुलाने हे कृत्य केले आहे. 27 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. आरोपीला मंगळवारी अल्पवयीन मुलांच्या चौकशी समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
27 एप्रिलच्या रात्री हा दीड वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत छतावर झोपला होता, त्यावेळी या 8 वर्षाच्या मुलाने त्याला अलगद उचलून खाली नेले. सुरुवातीला त्याने याला गटारात बुडवले, मात्र तरीही हा मुलगा जिवंत राहिल्याने नंतर त्याची दगड व विटा याने ठेचून हत्या केली. मृतदेह तसाच गटारात फेकून हा मुलगा निघून गेला. (हेही वाचा: सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव)
दुसऱ्या दिवशी बाळाची शोधाशोध सुरू झाली. घाबरलेल्या घरातल्या मंडळींनी पोलिसात बाळ हरवल्याची तक्रार केली. शेवटी गटारात हा मृतदेह आढळला, त्याचवेळी हा 8 वर्षाचा मुलगाही गायब असल्याचे निदर्शनास आले, शोधाशोध केल्यावर तोही सापडला. या मुलाची चौकशी केली असता त्याने सूड भावनेने हा खून केल्याची कबुली दिली. यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, आपल्या भावाला या दीड वर्षाच्या मुलीने मारले होते, त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य घडले असल्याचे समोर आले.