Elephant Deaths In Madhya Pradesh's Bandhavgarh: मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात 48 तासांत 8 हत्तींचा मृत्यू; काय आहे कारण? SIT करणार तपास

मात्र मंगळवारी त्यातील चार हत्तींचा संशयास्पद मृत्यू झाला, तर पाच गंभीर आजारी पडले. त्यापैकी बुधवारीही चार हत्तींचा मृत्यू झाला. हे सर्व हत्ती 200 मीटरच्या परिसरात बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर जबलपूर, उमरिया आणि कट्टीसह बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र चार हत्तींचे प्राण वाचू शकले नाहीत.

Elephants (फोटो सौजन्य - Pixabay)

Elephant Deaths In Madhya Pradesh's Bandhavgarh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बांधवगड राष्ट्रीय उद्यानात (Bandhavgarh National Park) 48 तासांत 8 हत्तींचा मृत्यू (Elephants Die) झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी चार हत्तींचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर बुधवारीही चार हत्तींचा मृत्यू झाला. केंद्रासह भोपाळहून आलेल्या तपास पथकाच्या प्राथमिक अहवालात असे समोर आले आहे की, एकतर या हत्तींनी चुकून काही विषारी द्रव्य प्राशन केले असावे किंवा त्यांना विषारी द्रव्य पाजले गेले असावे. मृत हत्तींमध्ये एक नर आणि 7 मादी आहेत.

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या पटोर रेंजमधील खतौली आणि सालखानिया परिसरात 13 हत्ती फिरत होते. मात्र मंगळवारी त्यातील चार हत्तींचा संशयास्पद मृत्यू झाला, तर पाच गंभीर आजारी पडले. त्यापैकी बुधवारीही चार हत्तींचा मृत्यू झाला. हे सर्व हत्ती 200 मीटरच्या परिसरात बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर जबलपूर, उमरिया आणि कट्टीसह बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र चार हत्तींचे प्राण वाचू शकले नाहीत. दोन अधिकाऱ्यांचे पथक उर्वरित हत्तींवर लक्ष ठेवून आहे. (हेही वाचा -NGT on Elephant Death in Kerala: केरळमध्ये 8 वर्षांत 845 हत्तींचा मृत्यू; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने दखल घेत स्वत:हून खटला केला सुरू)

दरम्यान, 8 डॉक्टरांच्या पथकाने मृत हत्तींचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन आणि प्राथमिक तपासात विष खुराणी किंवा कोडो कुटकीसारख्या फळांसह विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशयही डॉक्टर व्यक्त करत आहेत. हे विष जाणूनबुजून दिले गेले की, पिकातील कीटकनाशकांमुळे या हत्तींचा मृत्यू झाला, याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा - Elephants Dies Hit By Train: ट्रेनच्या धडकेत तीन हत्तींचा मृत्यू, पश्चिम बंगाल राज्यातील घटना)

हत्तींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन -

घटनेचे गांभीर्य पाहून हे प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून भोपाळ एसटीएफ व्यतिरिक्त वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोनेही स्वतःची एसआयटी टीम तयार केली आहे. याप्रकरणी नेमलेल्या एसटीएफने आजूबाजूच्या शेतात आणि सात घरांची झडती घेतली आहे. याशिवाय 5 किलोमीटरच्या परिघात शिकार आणि विषबाधा यासह विविध ठिकाणी तपास पथक तपास करत आहे.