Bangladesh Violence: हिंसाचारग्रस्त बांगलादेशातून परतले 778 भारतीय विद्यार्थी
आमच्याकडे 8,500 विद्यार्थी आणि 15,000 भारतीय नागरिकांचा मोठा विद्यार्थी समुदाय बांगलादेशात राहतो. त्यापैकी बरेच जण त्या देशात वैद्यकीय शिक्षण घेतात. ते सर्व सुरक्षित आणि निरोगी आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत.
Bangladesh Violence: भारताचा शेजारी देश बांगलादेशात (Bangladesh) सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Violence) उद्धभवला आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनांनी देशभरात हिंसक रूप धारण केले आहे. हिंसाचारग्रस्त देशांमधून लोक स्थलांतर करत आहेत. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत शेकडो भारतीय विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने देशात परतले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ढाका आणि चितगाव विमानतळांद्वारे नियमित उड्डाण सेवेद्वारे 200 विद्यार्थ्यांसह विविध भूबंदरांमधून किमान 778 भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत.
एका अधिकृत निवेदनानुसार, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्तांनी देशभरात हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतर भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी मदत केली आहे. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा क्रॉसिंग पॉईंट्सवर सुरक्षित प्रवास सुलभ करण्यासाठी उच्चायुक्त आणि सहायक उच्चायुक्तांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. (हेही वाचा -Russia Sentences US Journalist Evan Gershkovich: हेरगिरीच्या आरोपाखाली अमेरिकन पत्रकार इव्हान गेर्शकोविचला रशियाने सुनावली 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
आतापर्यंत, 778 भारतीय विद्यार्थी विविध भू-बंदरांमधून भारतात परतले आहेत. शिवाय, सुमारे 200 विद्यार्थी ढाका आणि चितगाव विमानतळांद्वारे नियमित विमानसेवेद्वारे मायदेशी परतले आहेत. बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये उरलेल्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याचं MEA ने निवेदनात म्हटलं आहे. ढाका आणि चितगाव येथून भारताला अखंडित उड्डाण सेवा सुनिश्चित करण्यासाठी आयोग बांगलादेशच्या नागरी उड्डाण प्राधिकरण आणि व्यावसायिक विमान कंपन्यांशी समन्वय साधत आहे.
दरम्यान, MEA प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आमचे सर्व भारतीय नागरिक तेथे सुरक्षित आहेत. आमच्याकडे 8,500 विद्यार्थी आणि 15,000 भारतीय नागरिकांचा मोठा विद्यार्थी समुदाय बांगलादेशात राहतो. त्यापैकी बरेच जण त्या देशात वैद्यकीय शिक्षण घेतात. ते सर्व सुरक्षित आणि निरोगी आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उच्चायुक्तालय तेथील परिस्थितीबद्दल नियमित अपडेट देत आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने देशव्यापी कर्फ्यू लागू केला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेशातील हिंसक निषेधाच्या घटनांमध्ये मृतांची संख्या आता 105 वर पोहोचली आहे. राजधानीत पोलिसांनी काही भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.