World Television Day 2019: मराठी भाषेतील काही चिरतरुण मालिका; अजूनही ताज्या आहेत त्या आठवणी

पूर्वी 13 भागांच्या मालिका बनत असत, मात्र डेली सोपअसणाऱ्या अशा अनेक मालिका आहे ज्यांच्या स्मृती मनाच्या पटलावर ताज्या आहेत, ज्यांची शीर्षकगीते लोकांच्या ओठांवर आहेत.

मराठी मालिका (संग्रहित संपादित प्रतिमा)

तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनावर मात करत आपल्या आयुष्यात अढळ स्थान निर्माण केले आहे. याच तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणजे आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात टचस्क्रीन फोन आहे आणि या फोनमध्ये ऑनलाईन स्ट्रीमिंग देणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. आज तुम्ही विविध सीरीज एका क्लिकवर पाहू शकता मात्र यासर्वात टीव्हीचे महत्व आजही अबाधित आहे. 21 आणि 22 नोव्हेंबर 1996 रोजी अमेरिकेने, पहिला जागतिक दूरदर्शन फोरम आयोजित केला. लोकांना माहिती पुरवण्यामध्ये टीव्हीचे महत्व आणि बदलत्या जगात तो नक्की काय भूमिका बजावेल यावर या फोरममध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 17 डिसेंबर 1996 रोजी ठराव मंजूर करीत, 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन  (World Television Day) म्हणून साजरा करायला सुरुवात केली.

मराठी भाषेत सह्याद्रीनंतर अल्फा वाहिनी सुरु झाली आणि लोकांच्या मनोरंजनाची परिसीमाच बदलली. पूर्वी 13 भागांच्या मालिका बनत असत, मात्र जेव्हा डेली सोप सुरु झाल्या त्यानंतर अशा अनेक मालिकांची नावे घेता येतील,  ज्यांच्या स्मृती मनाच्या पटलावर ताज्या आहेत, ज्यांची शीर्षकगीते लोकांच्या ओठांवर आहेत. याच मालिकांकडे पाहत आपण आज म्हणतो, ‘त्याकाळी खऱ्या अर्थाने उत्तम मालिका बनत असत’.  तर आजच्या या जागतिक दिनाचे औचित्य साधत चला पाहूया मराठीमधील अशा काही मालिका ज्या राहतील सदैव चिरतरुण

आभाळमाया – मराठी भाषेतील ही पहिली मालिका जिने लोकप्रियतेचे सर्व मापदंड ओलांडले. आजच्या मेगा सीरियल्सची सुरुवात झाली ती आभाळमाया या मालिकेमुळेच. घरातले नेहमीचे वातावरण, कौटुंबिक विषय, उत्तम कलाकार आणि तीन मुलींचा सांभाळ करत जगाशी लढणारी एक खंबीर स्त्री या गोष्टी या मालिकेतून दाखवण्यात आल्या होत्या. आजही हा मालिकेचे शीर्षकगीत तितकेच श्रवणीय असून अनेक कार्यक्रमात ते सादर केले जाते.

प्रपंच – आभाळमायानंतर जी दुसरी डेलीसोप हिट झाली ती म्हणजे प्रपंच. समुद्र किनाऱ्यावरील घर, घरात नांदणारे एकत्र कुटुंब, विविध नात्यांची हळुवार विणत जाणारी वीण या सर्वच गोष्टी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हव्या होत्या. या मालिकेच्या माध्यमातून त्या लोकांना पाहायला मिळाल्याने ही मालिकाही खूप लोकप्रिय ठरली होती.

दामिनी – दामिनी ही मराठीमधील पहिली मालिका जिने तब्बल 1000 भाग पूर्ण केले. एका आदर्शवादी महिला पत्रकाराचा संघर्ष या मालिकेमध्ये पहायला मिळाला होता. घरी असणारा महिलावर्ग डोळ्यासमोर ठेवूनच साकारलेली ही मालिका होती.

श्रीयुत गंगाधर टिपरे – केदार शिंदे यांची, दिलीप प्रभावळकरांच्या ‘लोकसत्ता’मधील ‘अनुदिनी’ या सदरावर आधारीत ही मालिका. पाच सदस्यांचे कुटुंब, प्रत्येकाचे विचित्र आणि त्यातून घडणाऱ्या विविध घटना अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने या मालिकेत मांडल्या होत्या. मालिकेला विनोदाचा टच असल्याने प्रेक्षकांना ही अजूनच भावली.

चार दिवस सासूचे – मराठीमधील सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजेच 11 वर्षे चालणारी मालिका म्हणून या मालिकेकडे पहिले जाईल. यामध्ये कविता लाड आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एकत्र कुटुंबातील विविध संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आले होते.

गोट्या - ना. धों. ताम्हणकर यांच्या ‘गोटय़ा’ कादंबरीवर ही मालिका आधारीत होती. या मालिकेचे शीर्षकगीत ‘बीज अंकुरे अंकुरे’ प्रचंड गाजले होते. (हेही वाचा: तब्बल 25 वर्षानंतर अमोल पालेकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन; साकारणार 'ही' भूमिका, जाणून घ्या डीटेल्स)

असंभव – झी मराठीची अजून एक गाजलेली मालिका म्हणजे असंभव. ‘असंभव’च्या कथेत पुनर्जन्माचा आणि तंत्र-मंत्राचा आधार होता. कौटुंबिक मालीकेंच्या ट्रेंडमध्ये हीच गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

बेधुंद मनाच्या लहरी – ई टीव्हीने मार्केटमध्ये पाय रोवायला सुरुवात केली ती मुळी या मालिकेने. या मालिकेने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले कलाकार मिळवून दिले. थेट तरुणाईला घातलेली साद प्रेक्षकांना फारच आवडली होती.

वादळवाट – 2003 मध्ये मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केलेली केलेली ‘वादळवाट’ ही मालिका बरीच गाजली. पत्रकारिता, वकील, कॉर्पोरेट, पोलीस क्षेत्र अशा विविध मुद्द्यांवर ही मालिका बेतली होती. या मालिकेने तब्बल 900 भागांचा टप्पा ओलांडला होता.

अवंतिका – आजही अनेकांना मृणाल कुलकर्णीला पहिले की अवंतिकाच आठवते. श्रीमंत कुटुंबातील मुलीच्या फसवणुकीची पाश्र्वभूमी या मालिकेला लाभली होती. त्यात पुण्यातील कथानक असल्याने दीर्घकाळ या मालिकेचा पगडा राहिला होता.

उंच माझा झोका – अलीकडच्या काळातील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे उंच माझा झोका. जुन्या काळात शिकण्यासाठी एका स्त्रीचा संघर्ष यामध्ये दाखवला होता.

तर अशा या मराठीमधील काही मालिका ज्यांनी इतके वर्षे प्रेक्षकांना टीव्हीशी खिळवून ठेवले आहे. यामध्ये झोका, सोनियाचा उंबरा, ऊन-पाऊस, या सुखांनो या, वहिनीसाहेब, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अग्निहोत्र,, झिका, अधुरी एक कहाणी, गंगूबाई नॉनमॅट्रिक, अवघाची हा संसार, रेशीमगाठी, कुलवधू अशा इतर अनेक मालिका सामील आहेत.