'तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल विक्रांत सरंजामेचा शेवट
'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार
अल्पावधीत काळात लोकप्रिय झालेली आणि टीआरपीच्या बाबतीत नेहमीच अव्वल स्थानी राहिलेली झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका 'तुला पाहते रे'(Tula Pahate Re) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चिन्हे एकूणच मालिकेच्या सद्य परिस्थितीतील भागांवरुन कळतय. मागील महिन्यात राजनंदिनीची एन्ट्री झाल्यानंतर या मालिकेने एक वेगळेच वळण घेतले होते. त्यात आता इशाच राजनंदिनीचा पुर्नजन्म आहे, हे कळताच मालिका दिवसेंदिवस रोमांचक होत चालली आहे. मात्र लवकरच ह्या मालिकेचे कथानक पुर्ण होऊन ह्या महिन्याअखेरीस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असे सांगण्यात येतय.
या मालिकेच्या संपूर्ण कथानकाची बांधणी आणि कालावधी पूर्वनियोजित असल्याचं सुबोधनं यापूर्वीच आपल्या मुलाखतीतून सांगितलं होतं. जेव्हा मालिकेचे प्रोमो झी मराठीवर दिसायला सुरुवात झाली होती तेव्हा आपल्यापेक्षा वयाने 20-25 वर्षाने मोठ्या असलेल्या पुरुषाशी असलेले प्रेम ह्या मालिकेत दाखवले जाईल असे सर्व प्रेक्षकांना वाटत होते. त्यावर अनेक जणांनी टिकाही केली होती. मात्र राजनंदिनीच्या एन्ट्रीने हे चित्रच संपुर्ण बदलून गेले. त्यात इशाला पडणारी स्वप्न, इशा हीच राजनंदिनी असल्याचा इशाला झालेला साक्षात्कार ह्या सर्व गोष्टीमधून रोज एक-एक गोष्टींचा उलगडा ह्या मालिकेतून होत आहे.
'तुला पाहते रे' मालिकेतील ईशाची आई गार्गी फुले - थत्तेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी !
तसेच आता सर्वांना उत्सुकता लागलीय ते इशा हीच राजनंदिनी असल्याचे विक्रांतला कधी कळणार आणि इशा विक्रांतचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणणार ह्याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहेत. कटकारस्थानी विक्रांतला आपण केलेल्या पापांचा पश्चाताप होणार की तो इशा विरुद्ध अजून काही नवीन खेळी करणार हे लवकरच कळेल.
मात्र एकूणच सद्य परिस्थितीतील कथानकावरुन लवकरच ही मालिका निरोप घेणार असे दिसतय. तसेच या मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका सुरु होते हे पाहणे ही औत्सुक्याचे ठरेल.