‘द कपिल शर्मा शो’ मधील 'या' कॉमेडियन विरुद्ध 50 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार, पोलीस तपास सुरु

.बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी द कपिल शर्मा शो मधील कलाकार किकू शारदा सहित अन्य सहा जणांवर 50 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लगावला आहे.

Kiku Sharda (Photo Credits: Instagram)

द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ’मधील कॉमेडियन किकू शारदा (Kiku Sharda) हा आपल्या जबरदस्त हटके कॉमिक टायमिंग मुळे नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. मात्र अलीकडेच त्याच्या विरुद्ध फसवणुकीच्या आरोपामुळे किकूला चांगलाच मनस्ताप झाला आहे.बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी (Nitin Kulkarni)  यांनी किकू शारदा सहित अन्य सहा जणांवर 50 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लगावला आहे. एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेल्या कामामध्ये हा घोटाळा झाल्याचे सांगत कुलकर्णी यांनी अंबोली पोलीस (Amboli Police Station) स्थानकात रीतसर तक्रार नोंदवली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुलकर्णी यांना संबंधित ट्रस्टने त्यांच्या कार्यक्रमासाठी सेट डिझाइन करण्याचं काम दिलं होतं. या कामासाठी कुलकर्णी यांना पेमेंटच्या रूपात 50 लाख 70 हजार रुपयांचा चेक देखील देण्यात आला होता मात्र हा चेक बाऊन्स झाला. यांनतर कुलकर्णी यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. या ट्रस्टचे सचिव हे किकू शारदा याचे वडील आहेत. (हे ही वाचा -सलमान खान स्वत:चे चॅनल काढणार, 'कपिल शर्मा शो'साठी मोठा निर्णय)

दरम्यान याप्रकरणी किकूने कुलकर्णी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले वडील हे ट्रस्टचे सचिव असले तरी आपला त्या ट्रस्टसशी काहीच संबंध नाही इतकेच काय तर आपण साधे या ट्रस्ट मध्ये सदस्यही नाही असे किकू याने म्हंटले आहे, तसेच आपण केवळ एकदा या ट्रस्टच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती पण विनाकारण आपले नाव यामध्ये गोवण्यात आल्याचे किकूने स्पष्ट केले आहे.याप्रकरणी ट्रस्टचे वकील अनूप पांडे आम्ही पोलिसांना सर्व पुरावे देऊ असे सांगितले आहे.