'चला हवा येऊ द्या' वादाच्या भोवऱ्यात; ... अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, संभाजी राजेंनी दिला इशारा
निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम अशा अनेक कलाकारांची तगडी टीम असणारा हा विनोदी शो मराठीमधील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) सध्या अडचणीत सापडला आहे. निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम अशा अनेक कलाकारांची तगडी टीम असणारा हा विनोदी शो मराठीमधील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात हे कलाकार रंगमंचावर विविध भूमिका वेगळ्या ढंगात सादर करून चाहत्यांचे तुफान मनोरंजन करतात. मात्र आता याचमुळे हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेल्याने, त्यावर आक्षेप घेतला गेला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ मधील एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून, या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला आहे. अशाप्रकारे दोन महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल या कार्यक्रमावर टीका होत आहे.
कोल्हापूरचे महाराज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडीयावर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी.अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या गोष्टीमुळे इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’
पुढे त्यांनी छत्रपतींचे घराणे कसे कलेचे भक्त होते हे देखील सांगितले आहे. ‘आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूर ला कलानगरी मध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवादांचे योगदान ही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’
यासोबतच अनेक चाहत्यांनी, प्रेक्षकांनीही याबाबत निषेध नोंदवत वाहिनी व साबळेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.