'सुखी माणसाचा सदरा' या भरत जाधव च्या नव्या मालिकेसाठी राज ठाकरे यांचं खास ट्विट; कोरोनाच्या सावटात हरवलेला आनंद परत मिळेल असा व्यक्त केला विश्वास

या मालिकेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Raj Thackeray & Bharat Jadhav | (Photo Credits: Facebook)

'सुखी माणसाचा सदरा' (Sukhi Mansacha Sadara) या नव्या मालिकेतून अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 25 ऑक्टोबरपासून ही नवीकोरी मालिका कलर्स मराठी (Colors Marathi) वरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कोरोना व्हायरस संकटामुळे हरवलेला आनंद या मालिकेच्या रुपाने पुन्हा सापडेल आणि तणावपूर्ण वातावरणात अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल, असेही राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. (येथे पहा मालिकेचा प्रोमो)

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं."

Raj Thackeray Tweet:

"ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि या मालिकेतून मिळणारा आनंद येणाऱ्या दिवसाला सामोरं जाण्याची ताकद देईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं, असेही ते म्हणाले. मालिकेसाठी केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांसह संपूर्ण टीमला राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेचा प्रोमोही त्यांनी ट्विटमध्ये जोडला आहे.

'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडगोळी नवं काहीतरी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यापूर्वी केदार शिंदे यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय', 'हसा चकट फू', 'साहेब बिबी आणि मी' यांसारख्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. तर कलेची जाण असलेले नेते अशी राज ठाकरे यांची ओळख आहे. मराठी कलाकारांच्या हक्कासाठी नेहमीच राज ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. इतकंच नाही तर आवडत्या कलाकृतीचे आणि कलाकारांच्या कामाचे भरभरुन कौतुक करतानाही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही.