आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे च्या वडिलांचं कोविड 19 मुळे निधन
त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण प्रकृती खालावत गेल्याने काल त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव ओसरत असला तरीही वाढती मृत्यूसंख्या चिंताजनक बनत चालली आहे. मागील दीड वर्षांच्या काळामध्ये अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. दरम्यान 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) या अभिनेत्रीनेही काल (18 मे) तिच्या वडिलांना करोना मुळे गमावलं आहे. स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अश्विनी ही 'अनघा'ची भूमिका साकारत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय आहे. दरम्यान अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण प्रकृती खालावत गेल्याने काल त्यांचे निधन झाले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अश्विनी आणि तिच्या कुटुंबाने कोविड काळात गरजूंना मोफत जेवणाची देखील सोय सुरू केली आहे.
सध्या 'आई कुठे काय करते' ची टीम इतर कलाकारांप्रमाणेच बायो बबल मध्ये राहून महाराष्ट्राबाहेर शूटिंग करत आहे. आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनघा आणि अभि च्या लग्नामधील रंजक वळण आहे त्यामुळे मालिका देखील एका नव्या वळणावर आहे. अश्विनी यापूर्वी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब यांच्या भूमिकेत दिसली होती. तर‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. ( नक्की वाचा: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकारांची आऊटडोअर शूटिंगदरम्यान ऑफस्क्रिन चाललेली धमालमस्ती तुम्ही पाहिली का?, Watch Photos).
काही दिवसांपूर्वीच या मालिकेमधील अप्पांची भूमिका साकरणार्या किशोर महाबोले यांच्या देखील वडिलांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांनी मालिकेपासून 10 दिवसांचा ब्रेक घेतला होता. अभि-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने त्यांची मालिकेत पुन्हा एंट्री दाखवण्यात आली होती.