IPL Auction 2025 Live

गेली अनेक वर्षे बॉलीवूडपासून दूर असलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला करावा लागला होता Casting Couch चा सामना; वाचा सविस्तर

नंतर तिने अनेक सिनेमात काम केले. त्या दरम्यानच आलेल्या काही बऱ्या वाईट अनुभवाबद्दल बोलताना ईशाने हा खुलासा केला आहे.

Isha Koppikar | (Facebook)

एके काळी आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना 'खल्लास' करणाऱ्या एका मराठी अभिनेत्रीला बॉलीवूड मध्ये काम मिळवण्यासाठी कास्टिंग काऊच सारख्या गलिच्छ प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. त्या अभिनेत्रीचं नाव आहे 'ईशा कोप्पीकर' (Isha Koppikar). गेली कित्येक वर्ष ती सिनेमासृष्टीपासून दूर आहे. राम गोपाल वर्माच्या 'कंपनी' मधून ईशाने आपल्या करियरला सुरवात केली. त्यामधील आशा भोसले यांनी गायलेल्या 'खल्लास' या गाण्यामुळे तिला प्रसिध्दी मिळाली. नंतर तिने अनेक सिनेमात काम केले. त्या दरम्यानच आलेल्या काही बऱ्या वाईट अनुभवाबद्दल बोलताना ईशाने हा खुलासा केला आहे.

ईशा म्हणाली,''हो. मला सुद्धा अनेक अनुभव आले. एकदा एका निर्मात्याने मला सांगितलं की सिनेमा तर होणार. फक्त तू या अभिनेत्याला एकदा कॉल कर. अभिनेत्यांच्या मर्जीत असणे महत्वाचे असते. त्यानंतर जेव्हा मी त्याला कॉल केला तेव्हा त्याने त्याची दिनचर्या मला सांगितली. तो लवकर उठतो आणि जिमला जातो, वगैरे. त्याने त्याच्या आगामी सिनेमाच्या डबिंग आणि कुठल्यातरी दुसऱ्या कामाच्या दरम्यान असणाऱ्या थोड्याशा वेळेत बोलावलं. मग त्याने विचारलं, की कोणासोबत येणार आहेस. ड्राइवर सोबत येत आहे म्हटल्यावर एकटीच ये असं म्हणाला. मला काय समजायचं ते समजलं. मी त्याला सरळ नकार दिला.'' त्यानंतर तो सिनेमा काही तिला मिळाला नाही. (हेही वाचा. 25 वर्ष काम केल्यावरही मला outsider सारखं वाटतं; Manoj Bajpayee चा खुलासा)

तसेच घराणेशाही बद्दल विचारले असता ईशा म्हणाली,''बऱ्याचदा मला सिनेमामध्ये एखादी भूमिका मिळालेली असे. पण कोणाचा तरी फोन येई आणि मग कोणाच्या तरी मुलीला ती भूमिका दिली जाई, किंवा एखाद्याच्या गर्लफ्रेंडला किंवा पत्नीकडे ती सोपवली जाई."

ईशा कोप्पीकर दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' या महेश मांजरेकर यांच्या मराठी सिनेमामध्ये दिसली होती. सध्या ती राजकारणातही सक्रिय आहे. ती भारतीय जनता पार्टीची सदस्य आहे.