'ठाकरे' सिनेमासाठी 'मणिकर्णिका'ची रिलिज डेट पुढे ढकलण्यास Kangna Ranaut चा नकार? पाहा काय म्हणाली...
पाहा काय म्हणाली कंगना रानौत...
बहुचर्चित 'ठाकरे' (Thackeray) सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी इतर कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते बाळा लोकरे यांनी घेतली होती. त्यानंतर 'ठाकरे' सोबतची टक्कर टाळण्यासाठी इमरान हाशमीच्या (Ibrahim Hashmi) 'चीट इंडिया'(Cheat India) सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली. मात्र याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झासी' (Manikarnika The Queen Of Jhansi) सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यास अभिनेत्री कंगना रानौतने (Kangna Ranaut) नकार दिला आहे.
याबद्दल कंगना म्हणाली की, "रिलिज डेट पुढे ढकलण्यासाठी कोणीही मला संपर्क केला नाही. कोणीही प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. मी खुश आहे की, सुट्ट्यांच्या कालावधीत हा सिनेमा प्रदर्शित होत आहे."
बाळ ठाकरेंचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बाळ ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री अमृता राव हिने मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे. तर 'मणिकर्णिका' या भव्यदिव्य सिनेमातून झाशीच्या राणीची जीवनकहाणी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यात अभिनेत्री कंगणा रानौत झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दोन्ही सिनेमे भव्यदिव्य असून तगड्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेले आहेत. मात्र प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.