Aishwarya Rai Bachchan च्या मॅनेजर साठी Shah Rukh ठरला 'हिरो'; प्रसंगावधान राखून वाचवले प्राण
प्रसंगावधान राखत योग्य वेळी केलेल्या कृतीमुळे ऐश्वर्या राय-बच्चनची (Aishwarya Rai- Bachchan) मॅनेजर अर्चना सदानंद हिच्यासाठी तो तारणहार ठरला आहे.
रुपेरी पडद्यावर हिरोचं काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शाहरुख खानने (Shahrukh Khan) नुकतंच खर्या आयुष्यातही एखाद्या हिरोप्रमाणे वागून आपल्या धाडसाची प्रचिती दिली आहे. प्रसंगावधान राखत योग्य वेळी केलेल्या कृतीमुळे ऐश्वर्या राय-बच्चनची (Aishwarya Rai- Bachchan) मॅनेजर अर्चना सदानंद हिच्यासाठी तो तारणहार ठरला आहे.
दर वर्षी प्रमाणे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'जलसा' या बंगल्यावर दिवाळीनिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. यंदासुद्धा सिनेमासृष्टीमधल्या सर्व कलाकारांना आग्रहाचं निमंत्रण होतं. बॉलीवूड मधील हे कलाकार पार्टी करण्यात गुंग होते. बराच वेळ मजा, मस्ती, जल्लोष केल्यानंतर काही जण घराकडे परतले. रात्री 3 च्या सुमारास गर्दी कमी झालेली असताना, ऐश्वर्याची मॅनेजर आपल्या मुलीसोबत बच्चन यांच्या अंगणात होती. त्याच वेळेस तिथे असलेल्या एका पणतीमुळे अर्चना हिच्या लेहेंग्याला आग लागली. काही कळायच्या आत ती आग वाढू लागली. तिथे उपस्थितांना काय करावं हे सुचेना. पण ही गोष्ट लक्षात येताच शाहरुखने त्वरित आपलं जॅकेट काढून लागलेली आग विझवायचा प्रयत्न सुरु केला. या दरम्यान आगीचे काही झोत शाहरुखच्या अंगावरही आले. (हेही वाचा. दसऱ्याच्या निमित्त शाहरुख खान याने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी, लवकरच मुलगा अबराम सोबत चित्रपटातून झळकणार)
दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगात अर्चना सदानंद यांना 15 % भाजले आहे. तर शाहरुखही अल्पशा प्रमाणात भाजला गेला आहे. अर्चना सदानंद यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. सोशल मीडियावर अर्चना सदानंद या लवकर बऱ्या व्हाव्यात ही इच्छा व्यक्त केली जात असतानाच शाहरुखच्या या धाडसाचं देखील कौतुक होत आहे.