या अभिनेत्याला घेऊन सलमान खान बनवणार मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक
सलमान खान आपला मेहुणा आयुष शर्मासाठी मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक बनवणार आहे
‘एका तालुक्याची नाही तर अख्ख्या देशाची गोष्ट’ असे म्हणत बहुचर्चित आणि वादग्रस्त मुळशी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. अल्पावधीतच या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रदर्शनापूर्वीच निर्माण झालेल्या अनेक वादांमुळे हा चित्रपट नेहमीच चर्चेत राहिला. त्याचसोबत वाढत्या शहरीकरणासाठी जमिनी बळकावल्या जातात या वादावर तसेच मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर हा सिनेमा भाष्य करत असल्याने, लोकांनी हा चित्रपट स्वतःशी रिलेट केला. म्हणूनच 11 दिवसांत हा चित्रपट 11 कोटींची कमाई करू शकला. अशा या चित्रपटाची उत्सुकता बॉलीवूडकरांच्या मनात निर्माण झाली नसेल तर नवल. म्हणूनच आता या चित्रपटचा हिंदीमध्ये रिमेक होणार असल्याच्या चर्चा आहेत. आश्चर्य म्हणजे हा रिमेक बनवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर, सल्लू मिया सलमान खान आहे. होय सलमान खान आपला मेहुणा आयुष शर्मासाठी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
‘लव्हयात्री’ चित्रपटातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपट चांगलाच आदळला. आता त्याचे करिअर सावरण्यासाठी सलमान ‘मुळशी पॅटर्न’ चा रिमेक काढणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात सलमानच्या कंपनीने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. नुकतेच सलमानने आयुषसोबत मिटिंग घेऊन या चित्रपटाविषयी चर्चा केली. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा शोध अजूनही चालू असून, मे-जून 2019 दरम्यान या चित्रपटाचे शुटींग सुरु होत असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच या चित्रपटासाठी आयुषचे प्रशिक्षणही सुरु होईल.
अभिनेता अरबाज खाननेदेखील मुळशी पॅटर्न हा सिनेमा पाहिला होता. हा चित्रपट त्याला आवडला असून, सिनेमाची कथा, सिनेमाचे दिग्दर्शन आणि सिनेमातील कलाकारांचे कौतुक त्याने केले होते.
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित या मराठी सिनेमाने महाराष्ट्रात बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला. अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या बहुचर्चित '2.0'च्या प्रदर्शनानंतरही या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद कायम राहिला. मराठी मुळशी पॅटर्नमध्ये ओम भूतकर या तरुणाने मुख्य भूमिका साकारली होती. मुळशी तालुक्यात घडलेल्या एका घटनेवर हा सिनेमा आधारीत आहे. दरम्यान आयुषने ‘लव्हयात्री’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. मात्र हा चित्रपट सपशेल आपटला होता. आता पुन्हा एकदा आयुषचे करियर सांभाळण्यासाठी सलमान धावून आला आहे.