सलमान खानला अशी मिळाली बिग बॉस होस्ट करायची संधी

सलमान खानपूर्वी 'या' अभिनेत्याला होती ऑफर..

छायाचित्र सौजन्य - योगेश शहा

सलमान खान आणि बिग बॉस हे आता जणू समीकरणच बनलं आहे. यंदा सलमान खान सलग 9व्या वेळेस बिग बॉसचं सूत्रसंचलन करणार आहे. दरवर्षी बिग बॉससाठी एक खास थीम असते. यंदा बाराव्या सीझनमध्ये 'जोडी'चा मामला आहे. काही स्पर्धक जोडीच्या स्वरूपात तर काही स्पर्धक

एकटेच घरात प्रवेश करणार आहेत. पुढे हा सीझन कसा रंगणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सलमान खानने केला खास खुलासा

गोव्यामध्ये यंदा बिगबॉसच्या 12व्या सीझनचा पहिला लूक मीडियासमोर मांडण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सलमानने मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देताना त्याच्या बिग बॉसच्या गेल्या 8 सीझनच्या प्रवासाची माहिती दिली. यादरम्यान त्याने बिग बॉस होस्ट करायची संधी त्याला कशी मिळाली याबाबत आश्चर्यकारक खुलासा केला.

सलमान खानपूर्वी बिग बॉस होस्ट करण्याची संधी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानला मिळाली होती. मात्र त्यावेळेस शाहरूख खान भारताबाहेर असल्याने आणि त्याच्या खांद्याचे दुखणे वाढत असल्याने तो भारतामध्ये येऊ शकला नाही. शाहरूख खाननंतर हा शो सलमान खानला ऑफर करण्यात आला आणि सलमानने तो स्विकारला. यापूर्वी सलमानने छोट्या पडद्यावर 'दस का दम'चं सूत्रसंचलन केलं होतं.

 टीआरपीमध्ये अव्वल शो

सलमान खान आणि बिग बॉसचा यापुढे सिलसिला सुरू झाला. सलमान खान गेल्या 8 सीझनचं सूत्रसंचलन केलं आहे. सलमान खानच्या होस्टिंगमुळे या कार्यक्रमाला खास स्थान मिळालं आहे. टीआरपीमध्येही 'बिग बॉस' अव्वल स्थानी असतो.

सलमान खानपूर्वी अभिनेता अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, फराह खान, संजय दत्त यांनीही या शोचं सूत्रसंचलन केलं आहे.