नाना पाटेकर यांच्या निर्दोष मुक्ततेचे वृत्त खोटे, पसरवली अफवा; खुद्द तनुश्री दत्ता हिने दिले स्पष्टीकरण

अजूनही नाना पाटेकर यांची तपासणी चालूच आहे, त्यांना क्लीनचिट दिली नाही.

Tanushree Dutta, Nana Patekar (Photo Credits: Instagram)

तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) यांमध्ये #MeToo प्रकरणामुळे उडालेले वादळ अजूनही शमले नाही. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटावेळी नाना पाटेकर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, असे आरोप तनुश्री दत्ताने केले होते. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आली. मात्र नाना पाटेकर यांची यात निर्दोष मुक्तता झाली आहे, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द केली होती. तपास केल्यावर ही बातमी पूर्णतः खोटी आणि अफवा असल्याचे समोर आले आहे. खुद्द तनुश्रीने याबाबत माहिती दिली आहे.

पिंकव्हिला (Pinkvilla)ने याबाबत वृत्त दिले आहे. या प्रकरणाबाबत तनुश्रीने एक पत्रक जारी केले असून, या केसचा अजूनही तपास चालू असल्याचे सांगितले आहे. ‘नाना पाटेकर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे अशा आशयाची बातमी सध्या मिडीयामध्ये पसरत आहे मात्र ती पूर्ण चुकीची आहे. अजूनही नाना पाटेकर यांची तपासणी चालूच आहे, त्यांना क्लीनचिट दिली नाही. याबाबत खुद्द मुंबई पोलीस आणि माझ्या वकिलांनी माहिती दिली आहे.’ अशा आशयाचे हे पत्रक आहे. चौकशी केली असता, परिमंडळ 9चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनीही नाना पाटेकर यांना क्लीनचीट दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुद्दाम खोटी बातमी पसरवल्याबद्दल तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या टीमला दोषी ठरवले आहे. (हेही वाचा: नाना पाटेकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाला ३ पानांचे उत्तर म्हणाले 'यापेक्षा अधिक मी सांगू शकत नाही!')

काय आहे प्रकरण ?

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान केला होता. नानांनी या आरोपांचे खंडन करून तनुश्री खोटे बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस आणि राजकारणी लोकांचाही या प्रकारात हस्तक्षेप झाला. शेवटी तनुश्रीने पोलिसांकडे अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह राकेश सारंग आणि निर्माता सामी सिध्दिकी यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर वकील अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत या प्रकरणाची लेखी तक्रार राज्य महिला आयोगाकडेही केली. आयोगाने याबाबत तातडीने कारवाई करत नाना पाटेकरांसह तिघांना नोटीस बजावली होती.