Salman Khan Death Threat Case: सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक, लवकरच मुंबईत आणणार
तसेच सलमान खानच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवला होता.
अभिनेता सलमान खानला (Salman Khan) नुकताच आलेल्या धमकीच्या ईमेलच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी रविवारी राजस्थानमधील (Rajasthan) एका व्यक्तीला अटक केली. आरोपीला वांद्रे पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्याला मुंबईत (Mumbai) आणले जात आहे. आरोपी धाकड राम बिश्नोई (21) हा जोधपूरमधील लुनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहीचा कलान गावातील सियागॉन की धानी येथील रहिवासी आहे. शस्त्रास्त्र कायद्याखालील एका गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर होता. (Salman Khan Death Threat: सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी चाहत्यांना सलमानच्या वांद्रे अपार्टमेंटबाहेर जमण्यापासून रोखले)
जोधपूरचे डीसीपी (पश्चिम) गौरव यादव यांनी सांगितले की, मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनचे एक पथक रविवारी बिश्नोईला अटक करण्यासाठी आले."त्यांनी आम्हाला बिश्नोईला ताब्यात घेण्यात मदत करण्यास सांगितले. आम्ही त्यांना मदत केली आणि बिश्नोईला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले," असे यादव म्हणाले.
धमकीच्या ई-मेलबद्दलची तक्रार प्रशांत गुंजाळकर यांनी अलीकडेच वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते सलमान खानच्या वांद्रेस्थित निवासस्थानी वारंवार भेट देतात आणि एक कलाकार व्यवस्थापन कंपनी चालवतात. गुंजाळकर अलीकडेच गॅलेक्सी अपार्टमेंटमधील खान यांच्या कार्यालयात उपस्थित होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की "रोहित गर्ग" या आयडीवरून एक ईमेल आला आहे. हिंदीमध्ये लिहिलेला ई-मेल पाठवणाऱ्याने सलमान खानला धमकी दिली होती.
या प्रकरणाच्या तपशीलवार तपासानंतर, पोलिसांना आरोपीच्या ठावठिकाणाबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर एक पथक राजस्थानला पाठवण्यात आले आणि त्या व्यक्तीला पकडण्यात आले धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगस्टर्सविरोधात एफआयआर नोंदवला होता. तसेच सलमान खानच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवला होता.