'आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम नाही दिला तर मल्टिप्लेक्स फोडून टाकू; मनसेचा इशारा
काशिनाथ घाणेकर' सिनेमाला प्राईम टाईम शो नाही मिळाला तर आम्ही मल्टिप्लेक्स फोडून टाकू असा धमकीवजा इशारा मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.
मराठी प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. अल्पावधीतच तमाम मराठी प्रेक्षकांची मने जिंकून, बॉक्स ऑफीसवर देखील या चित्रपटाने गर्दी खेचण्यास सुरुवात केली आहे. मात्र कल्याणसारख्या परिसरात जिथे मराठी लोकांची संख्या अधिक आहे, सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एकच शो आहे, आणि तोही दुपारी 3 वा. बाकीचे इतर सर्व शोज 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला दिले गेले आहेत. या कारणामुळे मराठी चित्रपटांची होत असलेली गळचेपी पाहून आता मनसे आक्रमक झाली आहे. या मराठी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्राईम टाईम शो मिळावा यासाठी मनसेने कल्याणमध्ये आंदोलन केले आहे.
या चित्रपटाला राज्याच्या विविध भागांतून प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. असे असतानादेखील कल्याणमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा 3 वाजता केवळ एकच शो दाखवला जात आहे. तर दुसरीकडे दिवसात ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे 8 शो दाखवले जात आहेत. दोन्ही चित्रपटांच्या समीक्षा पाहता लोकांची पसंती काशिनाथ घाणेकरला अधिक असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे जर घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम शो नाही मिळाला तर आम्ही मल्टिप्लेक्स फोडून टाकू असा धमकीवजा इशारा मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.
मराठी सिनेमांबद्दल मनसेने अनेकवेळा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात थिएटरमध्ये खाद्य पदार्थ विक्रिवरही मनसेने अनेक वेळा आंदोलन केली आहे. आताही काशिनाथ ला प्राईम टाईम देण्यासाठी मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेमॅक्स ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाचे शो वाढवणार का, याकडे मराठी सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.