सुप्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये आपल्या आगामी चित्रपट 'प्रीतम' मध्ये साकारणार संगीतकाराची भूमिका

संगीतातील त्यांचे हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये यांचा हटके अंदाज यात पहायला मिळतो आहे.

Upendra Limaye (Photo Credits: Instagram)

आपल्या धारदार आवाजाने आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) लवकरच आपल्याला संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. उपेंद्र आपला आगामी चित्रपट 'प्रीतम'(Pritam) मध्ये हातात पेटी घेऊन संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठीच त्यांनी हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्यांचे हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये यांचा हटके अंदाज यात पहायला मिळतो आहे.

येत्या 19 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रीतम या चित्रपटात 'पावलो म्हसोबा रे', 'धावलो पिसोबा रे' असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील हे भन्नाट गाणं अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालं आहे. या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो. उपेंद्र यांचा हे गाणं प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.हेदेखील वाचा- Amruta Khanvilkar Bold Photos: मराठमोळी अमृता खानविलकरच्या 'हे' ग्लॅमरस फोटोज पाहून बॉलिवूड अभिनेत्रींचा पडेल विसर

उपेंद्र लिमये, यांच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी 'प्रीतम' मध्ये पहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

'प्रीतम' चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. 'अॅड फिल्म मेकर' सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.