कोरोना व्हायरस संकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिस बांधवांना व्हिडिओ मार्फत सुबोध भावे याचा कडक सलाम! (Watch Video)
मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने पोलिसांचे खास शैलीत आभार मानले आहेत.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थिती सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तर आपल्या सुरक्षिततेसाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांसाठी देशातील नागरिक कृतज्ञ आहेत. पोलिसांच्या कार्याचे, मेहनतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याचत आता मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यानेही पोलिसांचे कौतुक करत त्यांचे खास शैलीत आभार मानले आहेत. यासाठी सुबोधने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. (कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा अमेरिका दौरा रद्द; सुबोध भावे याची खास पोस्ट)
या व्हिडिओत सुबोध म्हणतो की, "काही दिवस तुम्हाला-आम्हाला घरात बसाव लागलं म्हणून काय झालं? उस मैं क्या है? घाबरु नका. आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलिस सक्षम असून दिवसरात्र रस्त्यावर थांबून ते आपलं रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्याला माझा कडक सलाम!"
पहा व्हिडिओ:
कोरोना व्हायरसची चाहुल लागताच सुबोध भावे याने सोशल मीडिया पोस्ट द्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. हा विनोदाचा विषय नसून त्यांचा जीव गेला आहे त्यांचे तरी किमान भान ठेऊया, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.
पोलिसांसह आपल्याला अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांचे अनेक स्तरातून आभार मानले जात आहेत. नेते मंडळी, सेलिब्रिटी, क्रीडापटू यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्यासाठी या कठीण काळात आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या या सर्वांबद्दलच आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवे.