Exclusive: यापुढे बायोपिक करणार नाही- सुबोध भावे
मी सध्या थोडा ब्रेक घेतला आहे. 'तुला पाहते रे' ही मालिका करताना अनेक प्रोजेक्ट्स मी पुढे ढकलले होते, ते आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे."
Subodh Bhave Exclusive Interview: एक हुरहुन्नरी कलाकार म्हणून ज्याची मराठी सिनेसृष्टीत ओळख आहे असे सुबोध भावे पुन्हा एकदा टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण यावेळी कोणतीही मालिका नाही तर एका रिऍलिटी शोच्या मधून ते आपल्याला दिसणार आहेत. 'जय जय महाराष्ट्र माझा' असं या शो चं नाव असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित असणार आहे. आणि विशेष म्हणजे सुबोध भावे आपल्याला या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. या आधी सुबोध यांनी 'ढोलकीच्या तालावर' या लावणी स्पेशल रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
सुबोध यांनी LatestLY मराठी ला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत त्यांच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, "हा शो महाराष्ट्रातील लोककलेवर आधारित असल्यामुळेच मी याचं सूत्रसंचालन करण्यास तयार झालो. महाराष्ट्रातील लोककला तरुण पिढीपर्यंतही पोहोचावी असं मला वाटतं. आणि मी नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच मी हा शो खरंतर करायचा निर्णय घेतला आहे."
टेलिव्हिजनवर पुन्हा एखादी मालिका करणार का, या प्रश्नावर सुबोध म्हणाले, "इतक्यात तरी नाही. मी सध्या थोडा ब्रेक घेतला आहे. 'तुला पाहते रे' ही मालिका करताना अनेक प्रोजेक्ट्स मी पुढे ढकलले होते, ते आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मात्र नक्की की मी पुन्हा मालिकेत दिसेन, फक्त त्याला थोडा अवकाश आहे."
टेलिव्हिजन की सिनेमा, कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं, यावर बोलताना ते म्हणाले, "माझ्यासाठी सर्वच माध्यमं सारखी आहेत. त्यामुळे मी दोन्हीकडे काम करण्याला प्राधान्य देतो."
12 th Fail ते Superstar सुबोध भावे या प्रवासामधल्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
त्यांच्या येणाऱ्या काही प्रोजेक्ट्स विषयी सांगताना, ते म्हणाले, "माझे 2 चित्रपट सध्या बनण्याच्या प्रक्रियेत आहेत. तसेच मी एक चित्रपट प्रेझेन्टदेखील करत आहे. तो ही प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. पण हे मात्र खरं की मी यापुढे बायोपिक मात्र करणार नाही. कारण आता मला थोडं वेगळं काम करायचं आहे. मला एखादा सिनेमा लहान मुलांसाठी बनवायचा आहे, त्यासाठी मी एखादी परीकथा घेईन."
तसेच मराठी मनोरंजन विश्वात लहान मुलांसाठी चित्रपट बनत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.