Smile Please Movie Review: ललित प्रभाकर,मुक्ता बर्वे यांचा 'स्माईल प्लिज' सिनेमा उलघडणार मानवी भावनांचं हळवं विश्व
तसेच निर्माते-दिग्दर्शक प्रत्येकवेळी एक अनोखी कथा प्रेक्षकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यासाठी कथेची मांडणी, संवाद आणि विषय यांची साचेबद्ध आखणी यांच्या माध्यमातून चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे ठरते. त्यामधीलच 'एक स्माईल प्लिज' हा सिनेमा विक्रम फडणीस (Vikram Phadnis) यांनी दिग्दर्शित केला आहे.
Smile Please Marathi Movie Review: फॅशन डिझायनर आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस (Vikram Phadnis) 'हृद्यांतर' (Hrudayantar) सिनेमानंतर आता 'स्माईल प्लिज' (Smile Please) हा नवा सिनेमा घेऊन आला आहे. मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) ही रिफ्रेशिंग जोडी पहिल्यांदाच मराठी सिने रसिकांसमोर आली आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि टीझरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता हा सिनेमा नक्की कसा असेल याची उत्सुकता वाढली आहे. आयुष्यात कलेची जोड असल्यास व्यक्ती किती उत्सुक आणि भावनात्मक असतो याची ट्रीट तुम्हांला स्माईल प्लिज सिनेमात पहायला मिळणार आहे.
सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे त्याची कथा अगदी हळूवारपणे आयुष्यातील काही गोष्टी समजून घेतल्या तर कशा पद्धतीने उलगडू शकतात याची जाणीव करुन देतात. तर 'स्माईल प्लीज' म्हणणारी जर एखादी व्यक्ती आयुष्यात असेल तर रोजचा दिवस किती आनंदात जातो याची कल्पना करुनच चेहऱ्यावर हळूवार हास्य उमटते. या चित्रपटात कलाकारांनी साकारलेल्या भुमिका आणि त्यामधून प्रत्येकवेळी मिळणारा संदेश हा आयुष्यातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेतो. तर चित्रपटातील नंदिनी जोशी (मुक्ता बर्वे) नावाचे व्यक्तीमत्व हे महत्वकांक्षी, पुरस्कृत फोटोग्राफर आणि आपली कला हिच खरी स्वत:ची ओळख अशा पद्धतीचे दाखवण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नंदिनीपासून विभक्त झालेला, कामात नेहमीच व्यस्त असणारा शिशिर (प्रसाद ओक) आणि मुलगी आपल्या आईपासून दूर राहत असलेली दाखवण्यात आली आहे. तर नंदिनी तिचे वडील (आप्पा) यांच्यासोबत राहत असून आयुष्यात सुरु असलेल्या काही समस्यांकडे एका सकारात्मक भावनेने पाहते. या सर्व परिस्थितीत नंदिनीनी तिच्या आयुष्यात सुरु असलेल्या तणावातून बाहेर येण्यासाठी समुपदेशनासाठी जात असते. दिवसांमागून दिवस जातात तसे नंदिनी काही गोष्टी विसरु लागते. तर कधी नव्हे तो मुलीने शाळेतून तिला घरी आणण्यासाठी फोन केला असतो हे सुद्धा ती विरुन जाते. या गोष्टीवर नंदिनीला फार वाईट वाटते आणि मुलची माफी मागण्यासाठी निघते. परंतु शिशिर तिच्यावर राग व्यक्त न करता निघून जातो.
परंतु अवघ्या काही काळातच नंदिनीला विसरण्याच्या सवयीमुळे कामातून थोडा काळ आराम करण्यासाठी सांगितले जाते. नेहमीप्रमाणेच नंदिनी समुपदेशनासाठी जात असली तरीही तेथे सुद्धा सांगितलेल्या काही गोष्टी विसरते. मात्र विसरण्याच्या या प्रकारामुळे तिची एक चाचणी करण्यात येते आणि रिपोर्टमध्ये असे कळते की, नंदिनीला झालेला आजार अशा पद्धतीचा आहे की तो कधीच बरा होऊ शकत नाही. या बातमीमुळे नंदिनीला धक्का बसतो आणि आपण ज्या कलेवर, आपल्या घरातील सदस्यांवर प्रेम करतो त्यांचे पुढे काय होणार याची चिंता तिला सतावू लागते. तणावात असलेल्या नंदिनीची काळजी लक्षपूर्वक घेतली जाते. तर नंदिनीला कोणत्याच पद्धतीचा त्रास होऊ नये अशा गोष्टींपासून घरातील मंडळी दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र एकेदिवशी नंदिनी अचानक घरातून निघून गेली असल्याचे कळताच आप्पांना धक्का बसतो. नंदिनीच्या या आजारपणामुळे तिला नेमके कुठे शोधायचे याचा विचार त्यांना पडत ते दु:खी झालेले दिसून येतात.हरवेलेल्या नंदिनीला शोधायचे कुठे हा प्रश्न उभा राहतो पण ती एका गणपतीच्या मिरवणुकीत दिसून येते. गणपतीचे आगमन होत असल्याने गाजावाजा होत असतो. परंतु नंदिनी या परिस्थितीत गोंधळलेली, घाबरलेली दिसून येते. तिला आपण कुठे आहोत, आजूबाजूला काय चालू आहे याचेसुद्धा भान नसते.
एवढ्यातच तिच्या घरी राहण्यास येणारा विराज (ललित प्रभाकर) तिला या सर्व गोंधळातून सुखरुप घरी घेऊन जातो. घरात पाहुणा म्हणून विराज येणार आहे हे सुद्धा नंदिनी विसरुन जाते. मात्र विराज घरातील एकूणच परिस्थिती पाहता नंदिनीला तिच्या आजारापणापासून थोडे दूर राहून तिच्या चेहऱ्यावर हसू,आनंद कसा व्यक्त होईल याचा प्रयत्न करताना दिसतो. परंतु विराजच्या या गोष्टी शिशिर आणि मुलीला सुरुवातीला पटत नाहीत. तरीही विराज तिच्यासोबत दिवसातला थोडा वेळ घालवत तिची कला पुन्हा एकदा जोपासण्यासाठी प्रोत्साहन करतो. एकाबाजूला लहानपणीच आपल्या आईबाबांना गमावून बसलेला विराज नंदिनीच्या आयुष्यात हसू आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतो. तर एके दिवशी नंदिनी आणि विराज सहज समुद्र किनारी फिरायला जातात. तेव्हा विराजला सुर्यास्ताचे फोटो काढताना नंदिनी पाहते तरीही काही बोलत नाही. शेवटी विराज नंदिनीला सुर्यास्ताचे फोटो काढण्यास भाग पाडतो आणि एका सर्वोत्कृष्ट फोटोग्राफरप्रमाणे नंदिनी तिच्या कॅमेऱ्यातून ते क्षण टिपते. घरातील सदस्यांना या गोष्टीचा हेवा वाटतो खरे. पण विराज तिला अधिक प्रोत्सहान कसे करता येईल यामुळे घरातील सदस्यांसमोर फोटोंबद्दल नकारत्मक भुमिका मांडतो. विराजच्या या बोलण्यावरुन ती पुन्हा एकदा तिने काढलेले फोटो पाहत रहाते. परंतु विराजला कळलेली नंदिनी आणि तिची कला कशाप्रकारे सर्वांसमोर मांडता येईल यासाठी दोन महिन्याच्या कालावधीनंतर तिच्या फोटोंचे प्रदर्शन एका गॅलरीमध्ये भरवतो. यासाठी विराज नंदिनीला घेऊन तिला हवे तसे आणि विविध ठिकाणी प्रवास करत व्यक्तींचे हावभावांसह कॅमेऱ्याच्या विविध अँगलमधून टिपलेल्या क्षणांचे फोटो त्याने भरवलेल्या फोटो प्रदर्शनात सादर करतो. नंदिनीच्या या फोटोंच्या प्रदर्शनाला शिशिर येताच तिचे फोटो पाहून आनंदित होतोच पण आपण किती चुकीचे वागलो याची जाणीव तिला करुन देतो. मात्र नंदिनी त्यावेळी शिशिरच्या या शब्दांवर काहीच आपली प्रतिक्रिया देत नाही. नंदिनीचे तिने काढलेल्या फोटोंमुळे सर्वांकडून फार कौतुक केले जाते. तर चित्रपटाच्या अखेरला नंदिनी आपल्या झालेल्या आजारपणातून सुद्धा कशाप्रकरे आपण उत्तमोत्तम फोटो काढू शकलो याबद्दल तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी तिला देण्यात आलेल्या स्क्रिप्टमधून वाचून दाखवते. तर नंदिनीच्या चेहऱ्यावरील हसू आणि कलेला विराजमुळेच वाव मिळाला याचे स्पष्टीकरण ती सर्वांसमोर स्पष्ट करते. परंतु जेव्हा विराज फोटो गॅलरीच्या बाहेर येऊन नंदिला म्हणतो ''We Did It'' तेव्हा नंदिनीची अशी व्यक्त होते की मी एकटीनेच सर्व काही केले आहे असे तिचे चेहऱ्यावरील भाव असतात. तिच्या चेहऱ्यावरील दिसलेले भाव काही वेगळच सांगून गेल्याने विराज दुखावलेला दिसतो. मात्र नंदिनी जसं जशी पुढे जाते तशी विराजकडे पाहत हसून हातवारे करते. तर नंदिनीला आपण विराजसोबत काम केले, त्याच्यामुळेच हे सर्व साध्य झाले आहे हे पाहणे खुप उत्सुकतेचे आहे.
एकंदरच चित्रपट नात्यामधील भावना हृदयस्पर्शी असून त्याची कथा आयुष्यात एक मोलाचा संदेश देणारी आहे. मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक यांनीसुद्धा त्यांची भुमिका उत्तमरित्या चित्रपटात पार पाडली आहे. तर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा प्रेक्षकांना जरुर पाहायला भाग पाडणारा ठरणार आहे.
सारांश:
'स्माईल प्लिज' या चित्रपटाची कथा नात्यांमधील भावना आणि कलेचे वेड या मुख्य दोन गोष्टींवर खासकरुन लक्ष वेधून घेते. त्याचसोबत नंदिनीला असलेला आजार कधीच बरा न होणाऱ्यासारखा असला तरीही तिची खरी ओळख फोटोग्राफीमुळे तिला पुन्हा मिळते. तर आयुष्यातून दुरावलेली जीवाभावाची माणसेसुद्धा तिच्यावर पूर्वीसारखे प्रेम करु लागतात. एकूणच काय नात्यामधील गुंता हा सामांजस्याने सोडवला तर सहज सोडवता येतो असे म्हणण्यास हरकत नाही.