Navratri 2020: कोविड-19 संकटात भुतदया दाखवणाऱ्या कोरोना योद्धांना तेजस्विनी पंडित हिचा सलाम; नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी शेअर केला 'हा' खास फोटो!
नवरात्र उत्सवाच्या (Navratri 2020) पहिल्या दिवसापासून मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) कोरोना योद्धांच्या रुपात दुर्गेचे अवतार साकारत फोटो शेअर करत आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर, दुसऱ्या दिवशी पोलिस, तिसऱ्या दिवशी सफाई कर्मचारी, चौथ्या दिवशी शेतकरी महिला यांच्या रुपातील देवीचे विविध अवतार साकारल्या नंतर आज पाचव्या दिवशी तेजस्विनी अन्नपूर्णेच्या रुपात दिसत आहे. कोविड-19 लॉकडाऊन काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर उतरुन काम केले. अनेक स्वयंसेवकांनी गरजू, मुक्या प्राण्यांची सेवा केली. त्यांच्या जेवणाची सोय केली. त्यांच्या रुपात तेजस्विनीला अन्नपूर्णा दिसली. त्यामुळे त्यांच्या रुपातील अन्नपूर्णेचा हा लूक तेजस्विनीने शेअर केला आहे.
या फोटोत भाळी हळदीचा मळवट, लाल ठसठसीत कुंकू, हिरव्या बांगड्या, कानात रिंगा, नाकात नथ अशा रुपात तेजस्विनी दिसत आहे. ती रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना खाऊ घालत आहे. "विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना, मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना, आबाळ या जीवांची...आईस साहवेना, मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा." अशा संदेशासह तिने हा फोटो शेअर केला आहे. तसंच कोरोना काळात निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्धासाठी हा फोटो समर्पित केल्याचे तिने म्हटले आहे. (अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शेतकरी महिलेच्या मनाची अवस्था साकारत कोविड योद्धांना केला सलाम!)
पहा फोटो:
यंदा तेजस्विनी कोरोना संकट काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कोरोना योद्धांना दुर्गेच्या विविध रुपात दाखवणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच येणाऱ्या पुढील दिवसांत तेजस्विनीचे नवे दुर्गा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.