मराठी चित्रपट 'गोंधळ' Oscars 2027 साठी ठरला भारताची अधिकृत एंट्री
मराठी चित्रपट 'गोंधळ' ची 99व्या अकादमी अवॉर्ड्ससाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरीने 33 चित्रपटांमधून संतोष दावखर दिग्दर्शित या चित्रपटाची निवड केली आहे.
the 99th Academy Awards: संतोष दावखर (Santosh Davakhar) दिग्दर्शित 'गोंधळ' (Gondhal) या चित्रपटाची 99व्या अकादमी अवॉर्ड्ससाठी (Oscars) भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी मुंबईत ही घोषणा करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरीने यंदा स्पर्धेत असलेल्या 30 हून अधिक चित्रपटांमधून 'गोंधळ' या चित्रपटाची निवड केली.
यंदाच्या स्पर्धेत मैं वापस आऊंगा, बॉर्डर 2, धुरंधर मालिका यांसह डग डग, हक, भामरडो, 120 बहादूर, सिंग गीतम, तेरा मेरा नाता, लाडू, ओह माय डॉग, बालन द बॉय, देऊळ बंद 2, टिघी, पेड्डी, इरुमुडी, डोरोथी, खुंटा, गांधी टॉक्स, बायसन कलामदान, शेप ऑफ मोमो, गव्हर्नर, 2020 दिल्ली, कमांडो विन लव्ह स्टोरी, इक्कीस, प्रवास, मन आटाळे मनातले, ऑब्सेस, एग्वा, अंघ आणि हनुमान अंश या 33 चित्रपटांचा समावेश होता.
'प्रत्येक बाबतीत सरस ठरला चित्रपट'
इंडिया टुडेशी विशेष बोलताना निर्माते फिरदौसुल हसन यांनी सांगितले की, 'गोंधळ' हा चित्रपट प्रत्येक बाबतीत इतर चित्रपटांपेक्षा सरस ठरला. भारतीय संस्कृतीचे सुंदर चित्रण, अप्रतिम छायाचित्रण आणि संगीत यामुळे हा चित्रपट अकादमीकडे भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा निर्णय ज्युरीने एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्युरीने निवडलेल्या टॉप तीन चित्रपटांमध्ये 'इक्कीस' आणि 'अंघ' या चित्रपटांचाही समावेश होता.
काय आहे 'गोंधळ'ची कथा?
किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील पारंपरिक 'गोंधळ' या रात्रभर चालणाऱ्या लोककलेच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात संगीत, नृत्य आणि पौराणिक कथांचा समावेश असतो. लग्नसोहळ्यापासून सुरू होणारी ही कथा हळूहळू इच्छा, मत्सर, विश्वासघात आणि गावातील दबलेल्या तणावांच्या गडद वळणाकडे जाते.
दिग्दर्शक संतोष दावखर यांचा हा पहिलाच फीचर चित्रपट असून, गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) या चित्रपटाचे प्रिमियर झाले होते. तिथे या चित्रपटाला स्पेशल ज्युरी सन्मानासाठीचा सिल्व्हर पिकॉक पुरस्कारही मिळाला होता.
बॉक्स ऑफिसवर मात्र संमिश्र कामगिरी
महोत्सवांमध्ये वाहवा मिळवणाऱ्या 'गोंधळ'ची चित्रपटगृहांमधील कामगिरी मात्र तुलनेने सर्वसाधारण राहिली. नोव्हेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मर्यादित प्रतिसाद मिळाला होता, असे व्यापारी वर्तुळातील अहवालांचे म्हणणे आहे.
पुढील प्रक्रिया काय?
'गोंधळ'ची निवड ही केवळ पहिली पायरी आहे. यानंतर अकादमी आपली आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म मतदान प्रक्रिया राबवणार असून, प्रथम 15 चित्रपटांची शॉर्टलिस्ट आणि त्यानंतर अंतिम पाच नामांकनांची निवड केली जाईल. 99वे अकादमी अवॉर्ड्स (ऑस्कर) 14 मार्च 2027 रोजी होणार आहेत.