'मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्मसिटी उभारणार'; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा

मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी मुंबई आणि ठाणे दरम्यान फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'कलाकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्मसिटी बांधण्याची योजना आखणार आहे.'  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केली. यावेळी प्रसिद्ध मराठी रंगभूमी अभिनेते प्रशांत दामले यांना त्यांच्या 'एक लग्नाची गोष्ट' या नाटकाच्या 12,500 व्या प्रयोगानिमित्त सन्मानित करण्यात आले.

राज्य सरकार मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना मदत करेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आताच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'सध्या ठाण्यातही मोठ्या प्रमाणावर शूटिंग सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे दरम्यान 23 किमी अंतरावर फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे.' खराब स्थितीतील नाट्यगृहांची पाहणी करून त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली जाईल, असेही ते म्हणाले.

राज्याला केंद्राची साथ मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटी रुपये अनुदान, आर्थिक मदत केलेली आहे. यामुळे कुठलेही प्रकल्प आता थांबणार नाहीत. राज्यातील प्रकल्पांना केंद्र सरकारची आता तात्काळ मंजुरी मिळत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. (हेही वाचा: Mumbai: पाच फिल्म स्टुडिओला बेकायदेशीरपणे चालवण्याची परवानगी देणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता)

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करताना मुख्यमंत्री बोलत होते. यासोबत प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस पाठवली असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.