ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन; मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीचे चालतेबोलते विद्यापीठ हरपले
लागू यांचा जन्म झाला. तर, 1979 मध्ये लागू यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन (Dr. Shreeram Lagoo Passes Away) झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. गेले काही दिवस लागू हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी नाटक दोन्हीमंध्ये डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे अभूतपूर्व योगदान आहे. मराठी सिनेमा आणि नाटक यांमध्ये डॉ. लागू यांचा अभिनय मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’यांसारख्या चित्रपटांमधून लागू यांनी वटवलेल्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. तर, ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका प्रचंड गाजली. शब्दांची जाण, अचूक संवादफेक, टायमिंग आणि त्या जोडीला दमदार अभिनय हे लागू यांच्या रंगमंचावरील व्यक्तीमत्वाची खास ओळख होती.
डॉ. श्रीराम लागू हे केवळ अभिनेते नव्हते तर, सामाजिक आत्मभान असलेले आक्रमक आणि विज्ञानवादी कलाकारही होते. गेले प्रदीर्घ काळ ते रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांच्यापासून दूरावले होते. परंतू, विविध कार्यक्रम, पुरस्कार वितरण समारंभ, भाषणे आदींमध्यून ते लोकांसोबत जोडलेले असत. गेल्याच आठवड्यात त्यांना तन्वीर सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्याची सुरुवात डॉ. लागू यांनी केली होती. हा कार्यक्रम लागू यांच्या आयुष्यातल शेवटचा कार्यक्रम ठरला. लागू यांना तन्वीर नावाचा मुलगा होता. तन्वीर याचे अपघाती निधन झाल्यानंतर लागू यांनी आपल्या मुलाच्या नावाने (तन्वीर) पुरस्कार सुरु केला होता.
श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)
डॉ. श्रीराम लागू यांनी अग्निपंख (रावसाहेब), अँटिगनी (क्रेयाँ), आकाश पेलताना (दाजीसाहेब) ,आत्मकथा (राजाध्यक्ष), आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ), आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.), इथे ओशाळला मृत्यू (संभाजी), उद्याचा संसार (विश्राम), उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर), एकच प्याला (सुधाकर), एक होती राणी (जनरल भंडारी), कन्यादान (नाथ देवळालीकर), कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे), काचेचा चंद्र (बाबुराव) किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री), खून पहावा करून (आप्पा), गार्बो (पॅन्सी), गिधाडे (रमाकांत), गुरु महाराज गुरू (गुरुनाथ), जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा), डॉक्टर हुद्दार (हुद्दार), नटसम्राट (बेलवलकर) यांसह अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. (हेही वाचा, मराठी चित्रपटसृष्टीतील ५ राजकीय चित्रपट)
डॉ श्रीराम लागू यांचे गाजलेले चित्रपट
सिंहासन, सामना, पिंजरा, आपली माणसं, गुपचूप गुपचूप ,भिंगरी, मुक्ता,
एएनआय ट्विट
सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ. लागू यांचा जन्म झाला. तर, 1979 मध्ये लागू यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. त्यांच्या जाण्यामूळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.