Chandramukhi Poster Out: प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ अवतरणार रुपेरी पडद्यावर
'चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं आहे. घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती म्हणजे ही चंद्रमुखी.
Chandramukhi First Look: वर्षाच्या पहिल्याच महिन्यात धुराळा सारखा एक हिट सिनेमा मराठी सिनेसृष्टीने दिला तर नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'चंद्रमुखी' या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली असून, या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रसाद ओक याने आज सोशल मीडियावर चित्रपटाचा First Look शेअर केला आहे. 'चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं आहे. घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती म्हणजे ही चंद्रमुखी.
प्रसाद ओक यांनी सिनेमाचा पोस्टर शेअर करताना लिहिले, "तो ध्येयधुरंधर राजकारणी
ती तमाशातली शुक्राची चांदणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची
ही राजकीय रशीली कहाणी...!!! विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित, संगीतकार अजय-अतुल या जोडीसोबत प्रथमच, माझं नवं दिग्दर्शकीय पाऊल...!!! लवकरच...!!!"
विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ या कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर ही एक राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी गोष्ट आहे. परंतु, तमाशाच्या फडावर लावणी सादर करणाऱ्या या सौंदर्यवतीचं म्हणजेच ‘चंद्रमुखी’चं पात्रं नक्की कोणती अभिनेत्री साकारणार याबद्दल अजून सांगण्यात आलेलं नाही. परंतु, 'लागिरं झालं जी' फेम शिवानी बावकर या सिनेमातील प्रमुख पात्रं साकारू शकते, असं सूत्रांकडून कळले आहे.
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून सिनेमाची पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत.अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.