अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राजकारण प्रवेश निश्चित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाची जबाबदारी
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे मिलिंद आष्टेकर या मंडळींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे असे समजते.
अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या पत्नी प्रिया बेर्डे (Priya Berde) आता राजकीय पडद्यावर दिसणार आहेत. प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार असून आपल्या करिअरची नवी इनिंग सुरु करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृती आघाडीची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील 'निसर्ग' कार्यालयात हा पक्षप्रवे पार पडणार असल्याचे समजते.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे मिलिंद आष्टेकर या मंडळींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि इतरांचा पक्षप्रवेश एकाच वेळी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, सिनेसृष्टीत पडद्यावर, पडद्यापाठीमागे काम करणारे कलाकार, अनेक तंत्रज्ञ यांच्यासाठी काहीतरी भरीव काम करण्याची माजी इच्छा आहे. त्यामुळे हे काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग महत्त्वाचा ठरु शकतो. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयामुळे आपण सर्वसामान्य कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकतो, असा विश्वास वाटल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, 'अशी ही बनवाबनीवी'ची यशस्वी ३० वर्षे; रसिकांच्या हृदयात आजही अढळ स्थान)
दरम्यान, अभिनयासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचे माझे काम सध्या पुण्यात सुरु आहे. माझ्या मुलानेही त्याचे शिक्षण पुण्यातूनच पूर्ण केले आहे. तसेच, पुण्यामध्येच माझे हॉटेलही आहे. त्यामुळे माझ्या नव्या कामालाही मी पुण्यातूनच सुरुवात केली आहे. माझ्या कार्यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मदत मिळेन, अशी भावनाही बेर्डे यांनी व्यक्त केले आहे.