केतकी चितळे ला सोशल मीडियात ट्रोल करणार्‍यांपैकी एकाला औरंगाबाद मध्ये अटक

या ट्रोलिंगदरम्यान काहींनी अर्वोच्च भाषा, शिव्या यांचा वापर केला होता. दरम्यान केतकीने सडेतोड दिलेल्या उत्तराचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले होते.

Ketaki Chitle (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) सोशल मीडियात अश्लील भाषेत ट्रोल करणार्‍यांना तिनंही सडेतोड उत्तर दिलं. आता या प्रकरणात केतकीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सतिश पाटील (Satish Patil) या युवकाला औरंगाबादमध्ये अटक केली आहे. दरम्यान केतकीने सोशल मीडियातील ट्रोलर्सचा मुद्दा गांभीर्यने घ्यावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आवश्यक कारवाई करण्याबाबत विनंती केली होती. सोशल मीडियात ट्रोल करणार्‍यांवर कठोर कारवाई करा; केतकी चितळे ची देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती

केतकीच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादहून सतिश पाटीलला अटक केली. सतिश हा क्रेन ऑपरेटर असून तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

केतकीने एक हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तिला भाषेवरून ट्रोल करताना काही अर्वोच्च शब्द, शिव्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर व्हिडिओच्या माध्यमातूनच केतकीने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. मात्र त्यानंतर भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून तिने पोलिसांत तक्रार केली होती.

केतकी काही दिवसांपूर्वी 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेच्या सेटवर हेल्थ इश्युवरून निर्माते आणि केतकीमध्ये वाद झाल्याने तिला मालिकेतून हाकलण्यात आलं.